कोळा येथे बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस

कोळा येथे बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस
IMG-LOGO
Home सामाजिक कोळा येथे बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस
सामाजिक

कोळा येथे बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस

December 2023 125 Views 0 Comment
IMG

कोळा येथे बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस

▪️शेतकरी राहुल वाले यांचे बाजरी कणीस चर्चेचा विषय

सांगोला (प्रतिनिधी):- आजचा शेतकरी शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून डाळिंब पेरू आंबा सिताफळ उत्पादनाबरोबर शेती पिकातही भरारी घेताना दिसत आहेत अशाच शेतक-यापैकी कोळा ता. सांगोला येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणिस लागल्याने सांगोला तालुक्यात बाजरीचा कणीस चर्चेचा विषय ठरला असून, बाजरीचे शिवार पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वाले यांच्या शेतात गर्दी केली आहे. 

आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीत वेगवेगळे प्रयोग करून फळे पिके, शेती पिके, भाजीपाल्यात विक्रमी उत्पादन घेतांना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकाकडे वळाला असताना, आता पारंपारिक पिकातही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत याचे उत्तम उदाहरण राहुल वाले आहेत. बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले, पण आजवर आपण साधारण फूटभर लांबीपेक्षा कमी लांबीचे कणिस पाहिले असेल मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला ४ ते ५ फुटापर्यंत कणीस लागल्याचे आश्चर्य वाटायला नको, वाले यांनी राजस्थान वरून पोस्टाने १ हजार रुपये किलो दराने तुर्की वाणाचे बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात २० गुंठ्यांत अर्धा किलो बियाणे पेरणी केली होते.

यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले, बहरलेल्या बाजरीला तब्बल ३ ते ४ फुटापर्यंत कणीस लागल्याने तमाम शेतकरी वर्गातून वाले यांच्या बाजरीचे शिवार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते असा दावाही वाले यांनी केला. विशेष म्हणजे त्यासाठी मोजकीच खते वापरल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरी मध्ये फरक असून तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मुळव्याध व शुगर असलेल्या नागरिक खाऊ शकतात, असे सांगितले.