बँकेच्या अधिकाऱ्याला घातला तीन लाखांचा गंडा
सांगोल" />
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सोनेतारण कर्ज प्रकरण करायचे असून ज्वेलर्स मधून सोने सोडवण्यासाठी तात्पुरते तीन लाख रूपये असे सांगून दोघांनी मिळून अक्सिस बँकेच्या अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सांगोला शहरात घडली आहे.
याप्रकरणी किरण बाळासो भोसले रा.वाकीशिवणे, ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल पाटील आणि त्याचा अज्ञात साथीदार यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, किरण बाळासो भोसले रा.वाकीशिवणे, ता. सांगोला हे सहीबंधू मनी पाल गोल्ड लोन यांच्या वतीने सांगोला शहरातील अक्सीस बँकेत सोनेतारण कर्ज कौन्सलिंग अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सोने तारण कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांना समूपदेशन करून त्यांना कर्ज मिळवून देण्याकरीता प्रयत्न करीत असतात. 30 नोव्हेंबर रोजी किरण भोसले हे बँकेत काम करीत असताना सकाळी अकराच्या सुमारास हर्षल पाटील आणि एक अनोळखी इसम त्यांच्याकडे आले. द्रोपदी ज्वेलर्समध्ये आठ तोळे सोने तारण ठेवले असून ते मला तेथून सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करायचे आहे असे पाटील याने सांगितले. सोने सोडवण्यासाठी तीन लाख रुपये मला द्या, मी तुमच्या बँकेत सोनतारण कर्ज प्रकरण करून सोने तारण ठेवतो असे सांगितले. त्यानंतर किरण भोसले यांनी स्वतः जवळचे दीड लाख रुपये आणि सचिन रोकडे यांचेकडून दिड लाख रूपये घेऊन हर्षल पाटील व त्याचेसोबत एक इसम मोटरसायकलीवर व भोसले हे त्यांच्या मोटरसायकलवरून सोने सोडवून आणण्यासाठी निघाले. थोड्या अंतरावर हर्षल पाटील याने भोसले यांना तेथे थांबवून तुम्हाला सोनार ओळखेल तुमच्या जवळचे पैसे माझ्याजवळ द्या, ते मी सोनाराला देऊन सोने सोडवून घेतो असे म्हणून त्याचे जवळील पिशवीत तीन लाख रूपये घेतले. त्यानंतर हर्षल पाटील आणि अज्ञात इसम द्रोपदी ज्वेलर्स दुकानात गेले दोन मिनिटांनी बाहेर येवून भरधाव वेगाने मोटरसायकलवर पसार झाले. भोसले यांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते सापडले नाहीत. त्यांनी द्रोपदी ज्वेलर्स येथे येवून मालकाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदर दोन इसमांचे कोणतेही सोने माझ्याकडे तारण नसल्याचे सांगितले.