७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्" /> ७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात! महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, संगेवाडी मंडल कार्यालयात रंगेहाथ कारवाई
IMG-LOGO
Home क्राईम ७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात! महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, संगेवाडी मंडल कार्यालयात रंगेहाथ कारवाई
क्राईम

७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात! महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, संगेवाडी मंडल कार्यालयात रंगेहाथ कारवाई

March 2026 110 Views 0 Comment
IMG

७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात!

 

महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, संगेवाडी मंडल कार्यालयात रंगेहाथ कारवाई

 

सांगोला (प्रतिनिधी): सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडल अधिकारी आणि त्यांच्या चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तालुक्यात भ्रष्टाचार बोकाळल्याची चर्चा आता उघडपणे चौका-चौकात सुरू झाली आहे. शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना सांगोला तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी आणि त्यांचा खासगी चालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (५ मार्च) दुपारी संगवाडी मंडल अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

       याप्रकरणी मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक आणि त्यांचा खासगी वाहन चालक वैभव पिराजी मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱ्यांची जमीन, सातबारा, फेरफार, वारस नोंद, नकाशे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी महसूल कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. मात्र, अनेक वेळा ही कामे नियमाप्रमाणे होण्याऐवजी पैशांच्या व्यवहारावरच अवलंबून असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे त्या आरोपांना जणू दुजोरा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

      लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र हिम्मत लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार सातपुते यांच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मंडल अधिकारी विजया नाईक यांनी त्यांच्या चालक वैभव मोरे यांच्या मार्फत १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी मंडल अधिकारी नाईक यांनी चालकाच्या माध्यमातून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पडताळणीनंतर गुरुवारी दुपारी १.४१ ते सायं. ५.०२ या वेळेत संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.

      या कारवाईदरम्यान चालक वैभव मोरे याने तक्रारदाराकडून तडजोडीनंतर ठरलेले ७ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणात मंडल अधिकारी नाईक यांनी चालकामार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. कारवाईदरम्यान ७ हजार रुपये रोख रक्कम, आरोपींचे मोबाईल फोन, पडताळणी व सापळा कारवाईचे मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबी सोलापूरचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत. दरम्यान, महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सातबारा, फेरफार व जमिनीच्या नोंदीसाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून या कारवाईमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.