राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्र्याच" /> राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्र्याच्या मनुकुमारची विक्रमी धाव
IMG-LOGO
Home खेळ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्र्याच्या मनुकुमारची विक्रमी धाव
खेळ

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्र्याच्या मनुकुमारची विक्रमी धाव

July 2026 29 Views 0 Comment
IMG

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्र्याच्या मनुकुमारची विक्रमी धाव

 

 

डॉक्टर्स डे निमित्त सांगोल्यात राज्यस्तरीय मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यभरातील धावपटूंचा सहभाग

 

सांगोला (प्रतिनिधी): राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सांगोला शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगोला डॉक्टर असोसिएशन आणि सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत उत्तर प्रदेशातील आग्रा येथील धावपटू मनुकुमार याने १० किलोमीटर खुल्या गटात अवघ्या ३० मिनिटे २४ सेकंद या विक्रमी वेळेत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली. 

निरोगी समाज, सुदृढ युवा पिढी आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सांगोला डॉक्टर असोसिएशन व सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे सांगोल्यात उत्साहाचे आणि क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. न्यू इंग्लिश स्कूल येथून प्रारंभ झालेली ही मॅरेथॉन वासूद रोडवरील माण नदी परिसरापर्यंत पार पडली. स्पर्धा १० किलोमीटर खुला गट, ५ किलोमीटर पुरुष गट आणि ५ किलोमीटर महिला गट अशा तीन विभागांत घेण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील नामांकित धावपटूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढविली.

१० किमी खुल्या गटात चुरशीची लढत१० किलोमीटर खुल्या गटात आग्रा (उत्तर प्रदेश) येथील मनुकुमार याने ३० मिनिटे २४ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. दिनेश (मथुरा, उत्तर प्रदेश) याने ३० मिनिटे २८ सेकंदांसह द्वितीय, तर चैतन्य रूपनर (नागज, सांगली) याने ३० मिनिटे ३२ सेकंदांसह तृतीय क्रमांक मिळवला. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने झालेल्या या लढतीने उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.

५ किमी पुरुष गटात विशाल बनसोडे (नाशिक) प्रथम, शुभम दबके (कोल्हापूर) द्वितीय आणि अरविंद यादव (आग्रा, उत्तर प्रदेश) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. ५ किमी महिला गटात कामिनी ठाका (पिंपरी-चिंचवड, पुणे पोलिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल भाऊसाहेब खरा (नाशिक) यांनी द्वितीय, तर मोनिका वाकले यांनी तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. 

       स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी, तहसीलदार बाळूताई भागवत, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, डॉ.निकिताताई देशमुख, सूर्योदय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, डॉ.बंडोपंत लवटे, सुभाष दिघे, अर्चनाताई इंगवले, डॉ.शिवराज भोसले, डॉ.वैभव जांगळे, डॉ.सचिन गवळी, डॉ.राजेंद्र जानकर, डॉ.इरफान तांबोळी, डॉ.संगीता पिसे, डॉ.संतोष पिसे, डॉ.योगेश बाबर, डॉ.किरण जगताप, डॉ. सैफन तांबोळी, डॉ.रणजीत केळकर, डॉ.नेहा साळुंखे पाटील, डॉ.बालाजी धायगुडे, डॉ.निरंजन केदार, डॉ.शैलेश डोंबे, डॉ.महावीर आलदर, डॉ. विनीत दिघे, डॉ.प्रवीण गायकवाड, डॉ.सुहास पाटील, डॉ. शांता लवटे, डॉ.विजय बंडगर, डॉ.महेश राऊत, डॉ.धनाजी जगताप, डॉ.धनंजय गावडे, डॉ.अभिजीत सोनलकर, डॉ.प्रभाकर माळी, रेवनील ब्लड बँकेचे अध्यक्ष सोमेश यावलकर, सुरेश माळी, रोटरीचे अध्यक्ष माणिकराव भोसले, पत्रकार मोहन मस्के, डॉ.अमर शेंडे, पंचायत समिती सदस्य डॉ.आबासाहेब दबडे, अरविंद केदार, सुनील कोरे, शकील तांबोळी, वैभव कवडे यांच्यासह डॉक्टर, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.      

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलभाऊ इंगवले यांनी केले. डॉ. संगीता पिसे यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ. वैभव जांगळे यांनी मानले. राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक प्रा. विजय पवार, डी. के. पाटील आणि सुनील भोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे व इरशाद बागवान यांनी केले. तसेच सहप्रायोजक म्हणून रेवनील ब्लड बँक, सांगोला, माडगूळकर ज्वेलर्स, सांगोला आणि सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांनी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ विजेते ठरविणारी स्पर्धा न राहता फिट इंडिया, निरोगी समाज आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देणारा सामाजिक उपक्रम ठरला. राज्यभरातून आलेल्या धावपटूंच्या सहभागामुळे सांगोल्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून या स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

सांगोला मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक व जमलेले नागरिकांचा पाहून माननीय तहसीलदार बाळुताई भागवत मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना स्पर्धकांबरोबर पळण्याचा मोह अनावर झाला व त्यांनीही त्या स्पर्धकांबरोबर सांगोला मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी आरोग्य फिटनेस व्यसनमुक्ती या गोष्टी किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित केले. या स्पर्धकांबरोबर रोटरी, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना, सांगोला शहरातील पत्रकार बांधव, फार्मासिस्ट बांधव, व सांगोला शहरातील मॅरेथॉन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते