सांगोला (प्रतिनिधी):
सांगोला ग्रामीण रुग्णालयात प्रचंड प्रमाणात रुग्णांची लूट सुरू असून, रुग्णांना सेवा दिल्या जात नाहीत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अशातच मयत झालेल्यांच्या शवविच्छेदनासाठी 2,000 रुपये घेतल्याशिवाय मृतदेह नागरिकांच्या ताब्यात दिला जात नाही. शवविच्छेदनाचा रिपोर्ट देण्यासाठी डॉक्टरांकडून 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जाते.
धीरज भोरे नावाच्या स्वीपरची चौकशी करून, त्यांच्यासह पैसे मागणार्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा 12 मे 2026 रोजी सांगोला-पंढरपूर रोडवर बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मा. नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी 2,000 रुपये घेतल्याशिवाय नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. त्यानंतर चार-आठ दिवसांनी त्या मयताचे शवविच्छेदनाचे रिपोर्ट घेण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर संबंधित डॉक्टर 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करतात. याशिवाय शवविच्छेदन रिपोर्ट दिले जात नाहीत.
सांगोल्यात आपण मरावे का नको, असा प्रश्न जिवंतपणी नागरिकांना पडायला लागला आहे; कारण मेल्यानंतरही पैशासाठी नातेवाईकांची अडवणूक होत आहे. अगोदरच कर्जबाजारी व अन्य कारणामुळे आत्महत्या केली जाते. परत या भ्रष्टाचारामुळे नातेवाईकांना कर्ज होते. नातेवाईकांनी अशा जीवन जगावे का, असा प्रश्न पडला आहे.
मेलेल्या माणसाच्या मढ्यावरील टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. मरणही स्वस्तात नाही. मेल्यानंतरही आपला मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जर नागरिकांना पैसेच मोजावे लागत असतील, तर आजी-माजी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का?
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सेवा मिळत नाही; रूग्णांची लूट जात आहे. रात्री अपरात्री डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसतात. अशातच शवविच्छेदन करून मृतदेह पैसे घेतल्याशिवाय ताब्यात दिले जात नाहीत. ग्रामीण रुग्णालयात स्वीपर म्हणजे सफाई कामगार म्हणून त्यांची नेमणूक असताना ते शवविच्छेदन करतात. त्या स्वीपर या कामगाराला पगार असताना गोर-गरीबांची लूट का केली जाते याच्या कोणीच आवाज उठवत नाही.
त्यांच्या मोबाईलवरील फोनपे व गुगल पे व्यवहारांची तपासणी, तसेच मयत झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिलेल्या मृतदेहाचे टाइमिंग पाहिले व तपासणी केली, तर प्रत्येकाकडून पैसे घेतलेले दिसून येते. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी 2,000 रुपये घेणार्या त्याचबरोबर अॅम्ब्युलन्स रूग्णांच्या नातेवाईकांना देताना अॅम्ब्युलन्स मालकाकडून कमीशन खाणार्याचीही चौकशी करावी त्याचेही पुरावे उपलब्ध झाले आहेत. स्वीपर धीरज भोरे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून, तसेच शवविच्छेदनाचा रिपोर्ट देताना 5 ते 10 हजार रुपये मागणार्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी 12 मे रोजी सकाळी 11 वाजता सांगोला-पंढरपूर हायवेवर बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मा. नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.