झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी सांगोल" /> झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी सांगोला तालुक्यातील तरुण तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्यासह पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस
IMG-LOGO
Home क्राईम झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी सांगोला तालुक्यातील तरुण तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्यासह पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस
क्राईम

झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी सांगोला तालुक्यातील तरुण तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्यासह पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस

August 2026 73 Views 0 Comment
IMG

झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी सांगोला तालुक्यातील तरुण  तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्यासह पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस 

 

नवी मुंबई (प्रतिनिधी): पनवेल शहरातील झवेरी बाजार परिसरात सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करण्यासाठी दिलेल्या तब्बल ६६६.२३ ग्रॅम सोन्याच्या सहा लगडी घेऊन दुकानात काम करणारा कर्मचारी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी एका तरुणाने तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्याच्या सहा लगडी घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉपमधून सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथून शुभम मानाजी खिलारे यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अपहार केलेल्या सहाही सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रोशन रावसाहेब कोळेकर यांचे पनवेल येथील गोकुळ गोल्ड बिल्डिंग, झवेरी बाजार येथे ‘स्वरूप रिफायनरी’ नावाचे सोनाराचे दुकान असून सोन्याचे दागिने शुद्ध करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील शुभम मानाजी खिलारे (वय २०) हा मागील सुमारे आठ महिन्यांपासून काम करीत होता. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुकानातील सहा सोन्याच्या लगडींची शुद्धता तपासण्यासाठी शुभम खिलारे याला दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या मिडास हॉलमार्क सेंटर, जोशी आळी, झवेरी बाजार येथे पाठविण्यात आले. त्याच्याकडे एकूण ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही शुभम दुकानात परतला नाही. शुभम परत न आल्याने दुकान मालकांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळले. त्यानंतर मिडास हॉलमार्क सेंटरमध्ये काम करणारे स्वप्नील सावंत यांच्याशी संपर्क साधून शुभम तेथे आला होता का, याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी शुभम सुमारे दहा मिनिटांपूर्वी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तेथे येऊन गेल्याचे सांगितले. यानंतर दुकानमालकांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच शुभमच्या मित्रांकडे चौकशी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी रोशन रावसाहेब कोळेकर यांनी शुभम मानाजी खिलारे रा.खिलारवाडी ता.सांगोला याच्याविरुद्ध पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी विविध पथके तयार करून संशयित तरुणाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयित तरुणाचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान संशयित तरुण कुर्डुवाडी येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे जाऊन शुभम खिलारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेल्या ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा लगडी हस्तगत करण्यात आल्या. अवघ्या ४८ तासांत ६६ लाखांहून अधिक किमतीचे सोने हस्तगत करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-३, पनवेल आणि सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कामगिरी केली.
या कारवाईत सपोनि अभिजीत पाटील, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि किरण राऊत, पोहवा अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोना मिथुन भोसले, पोशि किरण कराड, पोना सोमनाथ म्हात्रे आणि पोशि शशिकांत काकड यांचा सहभाग होता.