वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार 

दि" /> वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार ; दिंडीत कार घुसली, मृत वारकरी करवीर तालुक्यातील
IMG-LOGO
Home क्राईम वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार ; दिंडीत कार घुसली, मृत वारकरी करवीर तालुक्यातील
क्राईम

वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार ; दिंडीत कार घुसली, मृत वारकरी करवीर तालुक्यातील

November 2022 616 Views 0 Comment
IMG

वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार 

दिंडीत कार घुसली, मृत वारकरी करवीर तालुक्यातील 

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत जाहीर

सांगोला (तालुका प्रतिनिधी): विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील वारकर्‍यांवर काळाने घाला घातल्याची दुर्देवी घटना घडली आहे. कार्तिकी वारीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी कार घुसल्याने माय-लेकरासह सात वारकरी भाविक ठार झाल्याची घटना सोमवार ३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ घडली. मृतात पाच महिला, एका पुरुषांसह एका १४ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तसेच पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

       अपघाताची माहिती मिळताच पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, स.पो.नि. नागेश यमगर, स.पो.नि. हेमंतकुमार काटकर, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

      याबाबत अधिक माहिती अशी, जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. तर एम.एच. 13 डी.ई. 7938 ही चारचाकी गाडी सांगोल्याकडे निघाली होती. दरम्यान ३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना जुनोनी ता. सांगोला गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली. यावेळी चारचाकी गाडी वारकऱ्यांना चिरडत गेली. या भीषण अपघातात जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील चार महिला, तीन पुरुषांसह एका लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रंजना बळवंत जाधव वय ५५, सर्जेराव श्रीपती जाधव वय ४५, शारदा आनंदा घोडके वय ४०, सुनिता सुभाष काटे वय ५०, शांताबाई जयसिंग जाधव वय ५० सर्वजण रा. जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर तसेच सुशिला पवार वय ३५, गौरव पवार १४ वय वळीवडे ता. करवीर जि. कोल्हापूर अशी अपघातात मरण पावलेल्या भाविकांची नावे आहेत. या अपघातात अनिता गोपीनाथ जगदाळे वय ६०, अनिता सरदार जाधव ५५, सरिता अरुण सियेकर वय ४५, शानुताई विलास सियेकर वय ३५, सुभाष केशव काटे वय ६७ हे पाच वारकरी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

भीषण अपघातात पाच वारकरी गंभीर झाले होते. त्यांना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमी झालेल्या वारकऱ्यांना उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले हे तब्बल दीड तासानंतर रुग्णालयात आले. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रेफर करण्याचे काम डॉ. उत्तम फुले करत असल्याने त्यांच्या कामाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान आरोग्यमंत्री ना.तानाजीराव सावंत यांनी अपघातात जखमी झालेले सुभाष काटे यांच्याशी बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत यांच्या फोनवरून संपर्क साधत तब्येतीची विचारपु्वक केली. तुम्ही काही काळजी करु नका. स्थानिक डॉक्टरांना तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून मी तुमच्यासोबत असल्याचे आरोग्यमंत्री सावंत सांगितले. 

 

 

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत जाहीर

 

 

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने धडक दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृत वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.