वार्तापत्र / प्रा.राजेंद्र ठोंबरे..
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्र. ३ मध्ये यंदा विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे. या प्रभागातून दिपकआबा गटाचे तरुण, सुशिक्षित आणि सर्वमान्य उमेदवार डॉ. वैभव जांगळे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर राजकीय वातावरणाला वेगळेच रंग चढले आहेत. उच्चशिक्षण, व्यावसायिक यश, सामाजिक भान आणि स्वच्छ प्रतिमा या चारही गुणांची उत्तम सांधेजोड असल्याने प्रभागातील मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
डॉ. जांगळे हे व्यवसायाने डॉक्टर तर शिक्षणाने वकील. त्या जोडीला सांगोला सुपरफास्ट या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी शहरातील प्रश्न, जनजीवन आणि प्रशासन यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच ‘‘समस्या ओळखणारा आणि उपाय मांडणारा उमेदवार’’ म्हणून ओळख अधिक मजबूत झाली आहे. आई सौ. फुलाबाई जांगळे या माजी नगरसेविका. त्यांच्या कार्यकाळातील स्वच्छ प्रतिमा आणि लोकसंपर्क याचाही डॉ. जांगळे यांच्या प्रचाराला फायदा होत आहे.
वार्ड क्र. ३ मध्ये जांगळे वस्ती, पवार वस्ती, पाटील वस्ती, बुंजगर वस्ती, स्पंदन हॉस्पिटल परिसर, भीमनगर आणि सांगोला शहराचा पूर्व भाग येतो. या संपूर्ण परिसरात मागील अनेक वर्षांपासून नागरिक एक मोठी तक्रार सातत्याने करत आले आहेत—पूर्व भाग विकासापासून वंचित राहिला आहे. शहराच्या पश्चिम भागात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना, वैद्यकीय सुविधा आणि सार्वजनिक सोयी-सुविधांचा वेगाने विकास झाला; मात्र पूर्व भागातील रस्त्यांची दुर्दशा, पाण्याची कमतरता, पावसात साचणारे पाणी, नाल्यांची अपुरी साफसफाई, कचरा व्यवस्थापनाची ढिलाई आणि शासकीय योजनांचा अपुरा लाभ यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत गेला.
स्थानिक नागरिकांच्या मते, ‘‘कॉंग्रेस विचारसरणीचा प्रभाव असल्याने विकासाकडे दुर्लक्ष झाले’’ असा आरोप वारंवार केला जातो. लोकप्रतिनिधी बदलले, पक्ष बदलले, पण समस्या बदलल्या नाहीत अशी नाराजी घराघरांतून व्यक्त होते. अशा परिस्थितीत, विकासाचा ठोस आराखडा, स्पष्ट भूमिका आणि वैयक्तिक स्वार्थापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा उमेदवार हवा होता. त्या गरजेवर डॉ. जांगळे यांनी बरोबर बोट ठेवले आहे.
डॉ. वैभव जांगळे यांच्या प्रचाराची सुरुवात होताच तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या दारोदारी संकल्पनामा सभांमध्ये नागरिक सर्वात जास्त बोलतात ते रस्त्यांबद्दल आणि पाणीपुरवठ्याबद्दल. बहुतांश वस्तीमध्ये घरांसमोर खडीचे रस्ते, दुतर्फा खड्डे, गटार व संडण्याची समस्या आणि पावसाळ्यात वाहती दलदल ही वर्षानुवर्षांची स्थिती झाली आहे. यावर उपाय म्हणून ‘‘पहिल्यांदा मूलभूत सुविधा – रस्ता, पाणी, प्रकाश’’ हा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आहे.
त्यांच्या संकल्पनाम्यातील काही प्रमुख मुद्दे असे—
* प्रभागातील सर्व रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण व डांबरीकरण..
* शाश्वत व दाबयुक्त पाणीपुरवठा योजना..
* नाल्यांचे वैज्ञानिक नियोजन व नियमित साफसफाई...
* प्रत्येक वस्तीमध्ये प्रकाशयोजना दुरुस्ती आणि नवीन एलईडी दिवे..
* आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरांचे नियमित आयोजन...
* नागरिकांना ‘सिंगल विंडो’ पद्धतीने सेवा मिळाव्यात यासाठी तंत्रज्ञानाधारित सुविधा...
* महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र उपक्रम...
या सर्व योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांचे म्हणणे साधे व स्पष्ट आहे—“विकासासाठी निधी अडसर नसतो, इच्छाशक्ती हवी आहे असते. मला जबाबदारी दिल्यास प्रभागात दृश्यमान बदल घडवून आणणे हेच पहिले लक्ष्य असेल.”
दिपकआबा गटाने असा तरुण, सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार उभा केल्याबद्दल प्रभागातील नागरिक खरंच समाधानी दिसतात. जांगळे कुटुंबाचा स्थानिक सामाजिक वारसा, आईच्या राजकीय अनुभवाची जोड, स्वतःची व्यावसायिक नैतिकता आणि तरुणाईची ऊर्जा—या चारही गोष्टींनी डॉ. जांगळे यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे.
प्रचारादरम्यान डॉ. जांगळे सर्वाधिक महत्त्व देतात ते नागरिकांच्या अपेक्षा थेट ऐकण्यास. प्रत्येक वस्तीमधील बैठकीत ते नागरिकांना एकच प्रश्न विचारतात—‘‘नेमकं काय हवं आहे?’’ त्यावर नागरिक स्वतः रस्ते, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, शाळांच्या मूलभूत गरजा, सार्वजनिक शौचालये आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर थेट सूचना देतात. या संवादातून त्यांच्या प्रचाराची दिशा ठरते. आक्रमक घोषणाबाजी किंवा विरोधकांवर टीका करण्याऐवजी ‘‘कामाच्या आधारावर राजकारण’’ ही त्यांची भूमिका मतदारांना भावते आहे.
वार्ड क्र. ३ मध्ये बहुसंख्येने कामगार, लघुउद्योजक, शेतकरी, कर्मचारी वर्ग, तसेच तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राहतात. याठिकाणी रोजगारनिर्मितीसाठी उपक्रम, कौशल्यविकास, महिला बचतगटांना प्रोत्साहन, वस्तीस्तरावर क्रीडांगण या बाबींची नागरिकांना अपेक्षा आहे. डॉ. जांगळे यांनी यासाठीही स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला आहे.
सांगोल्याचा हा पूर्व भाग राजकीय दृष्ट्या नेहमीच उत्सुकतावर्धक राहिला आहे. अनेक निवडणुकांत निकाल शेवटच्या क्षणी पलटताना पाहिला आहे. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. कारण सुशिक्षित तरुण उमेदवार, विश्वासार्ह प्रतिमा आणि ‘‘काम करून दाखवू’’ या भूमिकेमुळे मतदारांमध्ये आशावाद वाढत आहे.
प्रचारात वृद्ध, महिला व तरुणांकडून दिसणारा प्रतिसाद पाहता डॉ. जांगळे हे प्रभागासाठी एक नवी, ऊर्जायुक्त आणि जबाबदार नेतृत्वाची शक्यता ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या वार्ड क्र.व ३ ला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा संकल्प नागरिकांना पटतो आहे.