IMG-LOGO
Home सामाजिक प्रा. डॉ. रामचंद्र नानासाहेब यादव यांना- ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार !’
सामाजिक

प्रा. डॉ. रामचंद्र नानासाहेब यादव यांना- ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार !’

June 2026 53 Views 0 Comment
IMG

पुणे: किसन वीर महाविद्यालय, वाई (जि. सातारा) येथून सेवानिवृत्त झालेले मराठीचे विभाग प्रमुख प्रा.(डॉ.) रामचंद्र नानासाहेब यादव यांनी महाविद्यालयाच्या पातळीवर मराठी भाषेचे व साहित्याचे अध्यापन करता करता ललित साहित्याच्या निर्मितीचे व संशोधनाचेही कार्य केले. त्यांच्या ‘आराधना’ आणि ‘सर्वसाक्षी’ या दोन काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक झाला आहे. कविता, कथा, ललित निबंध, संशोधनात्मक प्रबंध असे विपुल लेखन करून डॉ. यादव यांनी मराठी साहित्य व साहित्याच्या संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातलेली आहे. त्यांनी ‘श्री ज्ञानेश्वर चरित्र’ हे आख्यान काव्यही लिहिले आहे. लवकरच ते प्रसिद्ध होईल. डॉ. यादव यांच्या साहित्याच्या क्षेत्रातील या कार्याची दखल साहित्यिक, समीक्षक, रसिक वाचक या सर्वांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर के. एस. आय. पब्लिकेशन संस्था आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून त्यांना ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार’ प्रधान करण्यात आला.

हा पुरस्कार अन्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या सोबतच प्रा. डॉ. यादव यांनाही के. एस. आय. पब्लिकेशन संस्था आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी संयुक्तपणे लोकमान्य टिळक ग्रंथालय , वाई (जि.सातारा) येथील दिनांक ७ जून २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘५ व्या राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलनात’ निमंत्रित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मा. नागनाथ श्रीपती डोलारे (नवीन पनवेल ), उद्घाटक मा. श्री. विलास धोंडीराम खरात , स्वागताध्यक्ष मा. शशिकांत कोचळे (वाई), संमेलनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कवी सरकार मा. श्री. विलास पाटील(इंगळी), मार्गदर्शक मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील( घुनकी), लक्ष्यतारा न्यूज चैनलचे संपादक श्री. सचिन विष्णू वाघमारे (आटपाडी) इत्यादी निमंत्रित मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. तर सभा मंडपात महाराष्ट्राच्या पुणे, मुंबई, कोकण,गोवा, मराठवाडा, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर अशा विविध भागातून आलेले पुरस्कारप्राप्त साहित्यिक , संमेलनातील सहभागी कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान करताना. सोबत योगेश रामचंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी सौ. ऐश्वर्या योगेश यादव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. विद्या थोरात-काळे (अंधेरी) व मा. दिपक पवार (रुकडी) यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. शेवटी निमंत्रित प्रमुख पाहुणे, पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी संमेलनातील सहभागी कवी, पत्रकार आणि श्रोते या सर्वांचे मा. संमेलनच्या आयोजकांनी आभार मानले व संमेलनाची सांगता केली.