बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे

पुणे(" /> बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे..

IMG-LOGO
Home सामाजिक बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे..
सामाजिक

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे..

September 2021 368 Views 0 Comment
IMG

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे

पुणे(श्याम ठाणेदार)

बाल विवाहावर कायदेशीर बंदी असूनही आज बाल विवाहाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बाल विवाहाचे प्रमाण लाक्षणीय आहे. महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही. लॉक डाऊनमध्ये तर बाल विवाहाचे प्रमाण खूप वाढले आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक बाल विवाह झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ या दीड वर्षाच्या कालावधीत एकट्या अहमदनगर जिल्ह्यात १८४ अल्पवयीन मुली बोहल्यावर चढल्याची बाब समोर आली आहे. शहरी भागात बाल विवाहाचे प्रमाण कमी आहे पण ग्रामीण भागात आजही मोठया प्रमाणात बाल विवाह होतात. भारत सरकारने २००६ साली बाल विवाह प्रतिबंधक कायदा नव्याने मंजूर केला. या कायद्यानुसार मुलीच्या लग्नाचे वय १८ तर मुलाच्या लग्नाचे वय २१ असे करण्यात आले. असे असले तरी आजही ग्रामीण भागात मुलीचे १४ ते १६ व्या वर्षीच लग्न होताना दिसते. महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या या कायद्यानुसार बाल विवाहास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद आहे. मात्र या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने या कायद्याचा धाक राहिला नाही. बाल विवाह झालेल्या व्यक्तींना लहानपणीच संसाराचा गाडा हाकावा लागतो त्यामुळे त्यांचे बालपण हिरावले जाते. शिक्षण अर्धवट राहते. बाल विवाह झालेल्या मुलींना अल्पवयातच मातृत्व प्राप्त होते त्यामुळे जन्माला येणारे बाळ देखील सशक्त नसते. बाल वयातच आई झालेल्या मुलीला देखील आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे कुपोषणासह अनेक रोगांना त्यांना सामोरे जावे लागते. आज आपला देश सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहे. इंटरनेट, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे आपण जगासोबत स्पर्धा करीत आहोत. अगदी चंद्रावर देखील आपण स्वारी केली आहे. जगातील प्रगत देशात आपली गणना होऊ लागली आहे. आधुनिक शिक्षण घेऊन काळाबरोबर आपण पुढे जात असताना खेडोपाड्यातील मुली बाल विवाहाला बळी पडत आहेत. ही विसंगती बदलायला हवी. त्यासाठी बाल विवाह या सामाजिक समस्येचे मुळापासून उच्चाटन व्हायलाच हवे. बाल विवाह या सामाजिक समस्येचे उच्चाटन करायचे असेल तर सर्वांनाच जागृत करणे गरजेचे आहे. भारतात बाल विवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, सामाजिक संस्था व समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाल विवाह रोखण्यासाठी ग्राम पातळीवरील समित्या सक्षम करण्याची गरज आहे. लग्नासाठी वयाची दाखले या समितीकडे जमा करुन त्या समितीची लेखी परवानगी घ्यावी असा नियम केला तर बाल विवाहास काही प्रमाणात आळा बसेल. बाल विवाह होऊ नये यासाठी विविध स्तरातून जनजागृती करावी. ज्याप्रमाणे अस्पृश्यता, सतीची चाल, विधवा पुनर्विवाहास बंदी, केशवपन या अनिष्ट चालीचे उच्चाटन झाले त्याप्रमाणे बाल विवाहाचे देखील उच्चाटन व्हायला हवे.