आयुष्यमान कार्ड मोहीम - शिवाजी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजने" />
सांगोला/प्रतिनिधीः
सांगोला नगरपरिषद सांगोला व शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी गरजू नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांना आयुष्मान भारत योजनेची माहिती दिली, त्यांना कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास मदत केली. तसेच नागरिकांना आयुष्मान कार्ड काढून दिले. अनेक कुटुंबांना या योजनेची माहिती नसल्यामुळे आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. मात्र, या उपक्रमामुळे त्यांना आयुष्मान भारत कार्ड मिळवून आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली.या योजनेअंतर्गत स्वयंसेवकांनी जवळपास 400 लोकांना आयुष्मान कार्ड काढून दिले.
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत सुरू करण्यात आली होती. या राष्ट्रीय आरोग्य योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि दुर्बल घटकातील सुमारे 50 कोटी लोकांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. या योजनेअंतर्गत, सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करते, ज्याचा लाभ कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मिळू शकतो. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत यादीत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये विमाधारक उपचार घेऊ शकतात.
आयुष्मान कार्ड बनवण्याचे फायदे
1) गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना रुग्णालयात दाखल केल्यावर मोफत उपचार मिळणार आहेत.
2) प्रति कुटुंब 5 लाख रुपयांची आरोग्य पॉलिसी दरवर्षी मिळणार आहे.
3) योजनेशी जोडलेल्या रुग्णालयांमध्ये प्रवेश घेतल्यावर कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध होईल.
4) आयुष्मान योजनेत 1300 हून अधिक आजारांवर उपचारांचा समावेश आहे.
5) या विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च देखील समाविष्ट केला आहे.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी सांगितले की, "राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजासाठी चांगले काम केले आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी कॉलेजमध्ये नेहमीच अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते."
संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, सचिव श्री.ए.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून श्री पी.जी.पवार व सह समन्वयक म्हणून श्री पी.बी.गायकवाड यांनी काम पाहिले.