वनविभागातील अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
सांगोला प्रतिनिधी :
विधानसभा सभागृहात लक्षवेधी सूचनेअंतर्गत वनविभागात झालेल्या अपहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत केली. यामध्ये सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेमध्ये संबंधित विभागाच्या तत्कालिन अधिकारी व इतर ७ अधिकारी यांनी १०९ कोटी रूपयांचा अपहार केल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वन विभागाने सुमारे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेऊन प्रत्येक जिल्ह्यातील वन विभागाअंतर्गत सामाजिक वनीकरण योजनेंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, परंतु सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता, रोपवाटीका न जगवता, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड न करता, खते व पाणी न देता, त्याचे संगोपन न करता खाजगी वन संरक्षक व इतरांच्या नावे बोगस बिले काढून तत्कालीन वन अधिकारी व इतर ७ जणांनी बनावट, बोगस अहवाल, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून करोडो रूपयांची संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली आहे तरी शासनाची फसवणूक करण्यात येणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासनाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नसून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली. याचबरोबर यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शासन लवकरात लवकर दोषींवर कारवाई करेल असे सांगितले.