भरधाव ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दिघेवाडीजवळ बस खड्ड्यात कोस" /> भरधाव ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दिघेवाडीजवळ बस खड्ड्यात कोसळली;३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिका यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली
IMG-LOGO
Home सुपरफास्ट विशेष भरधाव ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दिघेवाडीजवळ बस खड्ड्यात कोसळली;३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिका यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली
सुपरफास्ट विशेष

भरधाव ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दिघेवाडीजवळ बस खड्ड्यात कोसळली;३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिका यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

May 2026 26 Views 0 Comment
IMG

भरधाव ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दिघेवाडीजवळ बस खड्ड्यात कोसळली

३५ प्रवासी जखमी, १०८ रुग्णवाहिका यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

सांगोला (प्रतिनिधी) : नांदेडहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या अशोका ट्रॅव्हल्सच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने दिघेवाडी शाळेजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळल्याने प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भीषण अपघातात एम.एच.०९ ई.एल.४५२७ या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स मधील तब्बल ३५ प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅव्हल्स मध्ये ४० प्रवाशी होते. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी असून २३ प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यापैकी तिघे प्रवासी सिरियस असल्याने त्यांना उपचारासाठी पुढील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गंभीर जखमेवर सांगोल्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी प्रवाशी विशाल वामनराव साबळे रा.अहमदपुर, ता.अहमदपुर जि-लातूर, यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम पोलिसांनी
अशोका ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातात ट्रॅव्हल्सचे अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अशोका ट्रॅव्हल्स कंपनीची एम.एच.०९ ई.एल.४५२७ ही खाजगी ट्रॅव्हल्स नांदेडहून कोल्हापूरकडे निघाली होती. पहाटे तीनच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सांगोला मंगळवेढा रोडवरील दिघेवाडी शाळेजवळ ही खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की बस खड्ड्यात कोसळताच प्रवाशांचा आक्रोश सुरू झाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. काही वेळातच आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्याने मदतकार्याला वेग आला.
या भीषण दुर्घटनेत जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, १०८ रुग्णवाहिका सेवेनं दाखवलेली तत्परता अनेक प्रवाशांसाठी जीवनदायी ठरली. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका, १०२ रुग्णवाहिका, महामार्गावरील १०३३ रुग्णवाहिका तसेच काही खासगी रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या. १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर वैभव जांगळे आणि पायलट दत्तात्रय भोसले यांनी अत्यंत वेगाने व समन्वयाने कार्य करत गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार दिले.
त्याचबरोबर १०२ रुग्णवाहिकेवरील चालक नवलेतात्या, सचिन चांदणे, विलास सोळंकी, रोहित शिंदे तसेच १०३३ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि सुपरवायझर सिद्धेश्वर भोसले यांनीही जखमींना तातडीने सांगोला येथील रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी धावपळ केली. अपघातानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर राबविलेल्या मदतकार्यातून अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने अशा वाहनांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. सांगोल्यात छोटी मोठी वाहने, कार व दुचाकींची आरटीओकडून दिवस-रात्र तपासणी सुरू असताना, दररोज हजारो किलोमीटर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य वाहनधारकांवर कारवाई आणि ट्रॅव्हल्सना मोकळीक, असा दुहेरी निकष का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मोठ्या प्रवासी वाहनांची नियमित फिटनेस, परवाने व विमा तपासणी तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेजबाबदार वाहतुकीवर आरटीओ प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.


लोकप्रिय बातम्या