पॅरालिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगीरी
पॅरालिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगीरी
IMG-LOGO
Home खेळ पॅरालिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगीरी
खेळ

पॅरालिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगीरी

September 2021 269 Views 0 Comment
IMG

 

पॅरालिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगीरी

पुणे ( श्याम ठाणेदार)

टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिकची नुकतीच सांगता झाली. भारतासाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. भारताने या स्पर्धेत ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदकासह एकूण १९ पदके जिंकत पदक तालिकेत २४ वे स्थान मिळवले. भारताने यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत इतकी पदके मिळवली नाहीत म्हणूनच भारतासाठी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली. यापूर्वी २०१६ साली झालेल्या रियो दि जीनेरिया पॅरालिम्पिकमध्ये भारताने अवघी चार पदके मिळवली होती याचाच अर्थ केवळ पाच वर्षात भारताने चार वरून एकोणीस पर्यंत उडी मारली. या विक्रमी कामगिरीचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. यापूर्वीच्या सर्व स्पर्धात मिळून भारताला १२ पदके मिळाली होती. या एकाच स्पर्धेत भारताने १९ पदके जिंकली आहेत आता भारताकडे पॅरालिम्पिकची ३१ पदके आहेत. अवघ्या पाच वर्षाच्या काळात खेळाडूंनी घेतलेले अपार कष्ट या ऑलिम्पिकमध्ये फळास आले. अर्थात यावेळी भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा होतीच पण त्यांनी अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी करून देशवासीयांना आश्चर्याचा धक्का दिला. टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने भारताला पहिले पदक मिळवून दिले त्यानंतर पदकांचा धडाकाच सुरू झाला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, उंच उडी, अशा क्रीडा प्रकारात भारताने पदके जिंकली. भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडूंची ही कामगीरी वाखाणण्याजोगी आहे. भारताची पदक संख्या आणखी वाढू शकली असती पण काही खेळाडूंची पदके अगदी थोडक्यात हुकली. यावर्षी ९ विविध क्रीडाप्रकारांममध्ये ५४ पॅरा एथलीट सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या विक्रमी कामगिरीचा १४० कोटी भारतीयांना अभिमान आहे. पॅरालिम्पिक ही दिव्यांग खेळाडूंची ऑलिम्पिक स्पर्धा असते. मुख्य ऑलिम्पिक संपल्यानंतर तिचे आयोजन केले जाते. मुख्य ऑलम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिकलाही प्रतिसाद मिळाला पाहिजे. खेळाडूंचे कौतुक झाले पाहिजे पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मुख्य ऑलिम्पिकमध्ये भारताने अवघी सात पदके मिळवली. त्यावेळी भारतीयांना आनंदाचे भरते आले. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यावर तर देशात दिवाळी साजरी झाली. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर या खेळाडूंच्या अभिनंदनाची स्पर्धाच लागली पण पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या दिव्यांग खेळाडूंच्या पदरी मात्र निराशाच आली. या खेळाडूंचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही. नीरज चोप्रा हे नाव आज १४० कोटी लोकांना माहीत आहे पण पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंपैकी एकाही खेळाडूचे नाव देशातील लोकांना माहीत नाही याला काय म्हणावे? प्रसारमाध्यमांनी देखील पॅरालिम्पिकला म्हणावे तितके कव्हरेज दिले नाही. पॅरालिम्पिकपेक्षा त्यांना इंग्लड आणि भारत यांच्यात सुरू असलेली क्रिकेट कसोटी मालिका महत्वाची वाटली. पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी करूनही या दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचे श्रेय मिळाले नाही. दिव्यांगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन समाधानकारक नाही हेच यातून स्पष्ट होते. आजही दिव्यांगाकडे सहानुभूतीनेच पाहिले जाते. वास्तविक या पदक विजेत्या खेळाडूंना सहानुभूतीची नाही तर कौतुकाची, प्रोत्साहनाची गरज आहे. दिव्यांग खेळाडूंकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला तर ते देशासाठी आणखी चांगली कामगिरी करुन देशाचे नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही. पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मनापासून अभिनंदन!