IMG-LOGO
Home राजकारण खा.शरद पवार साहेब दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाचे भाषण जसे च्य तसे
राजकारण

खा.शरद पवार साहेब दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाचे भाषण जसे च्य तसे

February 2025 57 Views 0 Comment
IMG

निलेशकुमार कुलकर्णी लिखित 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित केलं.

 

महाराष्ट्राचे वरिष्ठ पत्रकार आणि खासदार श्री. संजय राऊत, खासदार श्री. अनिल देसाई, नाशिकचे खासदार श्री. भास्कर भगरे गुरुजी, दिल्ली आणि संसदेसंबंधी ज्यांनी इतिहास आपल्यापुढे मांडला ते निलेशकुमार कुलकर्णी, व्यासपीठावरील अन्य मान्यवर पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनींनो...

 

दिल्लीच्या संसदेमध्ये गेली अनेक वर्ष जो काही इतिहास घडला त्याबद्दलचं वास्तव चित्र श्री. कुलकर्णी यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. दिल्लीच्या संसदीय राजकारणामध्ये ज्यांना रस आहे तसंच त्यासाठी कष्ट करून येथे प्रवेश करण्यासाठी, आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकष्टा करतात. अनेकांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही दिल्ली मधूनच झाली. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली आहे असं नाही पण राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर राजकीय पक्षांशी, राजकीय नेतृत्वांशी आणि राजकीय संघटनांशी सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता असते आणि त्या सुसंवादाचा केंद्र हे दिल्लीच आहे.

 

मी आता सहज विचार करत होतो की, मी दिल्लीमध्ये कधी आलो? मी दिल्लीमध्ये आलो १९६२-६३ ला त्याआधी मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो आणि त्याची एक राष्ट्रीय समिती होती. त्या राष्ट्रीय समितीची बैठक होती. त्या राष्ट्रीय समितीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या. आणि ति बैठक बोलावली होती ती 'त्रिमूर्ती'ला. 'त्रिमूर्ती' हे पं. जवाहरलाल नेहरूंजींचं निवासस्थान, इंदिराजींचं निवासस्थान आणि आम्हाला सगितलं 'त्रिमूर्ती'ला बैठक आहे. पं. जवाहरलाल नेहरू येणार आहेत, इंदिरा गांधी अध्यक्ष असतील. आम्ही अतिशय औत्सुक्याने त्या बैठकीला गेलो. मी होतो, वायलर रवी नावाचे आमचे एक केरळचे एक मित्र होते, नंतर ते मंत्रीही झाले. त्याशिवाय अनेक राज्यांचे तरुण नेते होते. आमच्या आयुष्यातला हा आगळावेगळा प्रसंग होता आणि आम्ही अतिशय आनंदित होतो. आधी दोन दिवस आम्ही एकत्र आलो आणि काय बोलायचं, कोणते मुद्दे मांडायचे, कोणत्या गोष्टीचा आग्रह धरायचा त्याबद्दल आम्ही आमच्या-आमच्यात चर्चा करत होतो, सुसंवाद करत होतो. आम्ही विषय वाटून घेतले. मी कशावर बोलायचं, बाकी आमचे सहकारी होते त्यामध्ये मध्यप्रदेश मधून अर्जुन सिंग होते, अन्य राज्यातून असे तरुण नेते होते जे नंतर मोठे नेते झाले. आम्ही सगळे विषय वाटून घेऊन त्या बैठकीला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं होतं ते पुण्यामध्ये. पं. नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी येत असत आणि फुटपाथवरून आम्ही त्यांना पाहत असू. पण ३० लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसलो होतो आणि ठरवलं होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे, इंदिरा गांधींना ते प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीने आम्ही बैठकीत बसलो. हे दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो. त्यांना प्रश्न विचारायचं धाडस हे आम्हा लोकांना झालं नाही कारण ते व्यक्तिमत्वच इतकं मोठं होतं त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हा लोकांना शक्य झालं नाही. माझ्या आयुष्यातील दिल्लीतील राजकीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती आणि जिथे उत्तुंग नेत्यांना जवळून भेटता आलं पण तोंडातून एक शब्द बाहेर निघाला नाही.

 

नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण दिल्ली बघतोय. आताच खासदार राऊतांनी दिल्लीची अनेक वैशिष्ट्य सांगितली. दिल्लीमध्ये अनेक लोकांनी आपलं श्रेष्ठत्व, कर्तुत्व प्रस्थापित केलेलं आहे. या पुस्तकाचा विचार तुम्ही जर केला तर त्यामध्ये अनेक भाग आहेत. स्वातंत्र्याच्या आधीचा आहे, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्येही जेव्हा लोकप्रतिनिधींचा सरकार आलं त्यामध्ये अनेक सरकार आली त्याबद्दलची यात माहिती आहे. त्या सरकारांचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर आहेत त्यांची वैशिष्ट्य काय त्याचा उल्लेख यामध्ये आहे आणि एका दृष्टीने हा इतिहासाचा एक मोठा भाग या पुस्तकामध्ये लेखकांनी मांडलेला आहे.

 

जुनी जी संसदेची इमारत आहे, तिथे अनेक जुन्या इतिहासातील महत्त्वाच्या भागांचे किस्से तिथे झाले आहेत. ती संसदेची इमारत आणि त्याचं ते नियोजन इंग्लंड मधला एक आर्किटेक्ट आहे ज्याचं नाव सर एडविन ल्यूटन्स त्याने हे आर्किटेक्चरल डिझाईन १९२१ ते १९२७ मध्ये तयार केलं होतं. आणि त्यामधून ही वास्तू उभी राहिली आणि ती आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या अंत:करणांमध्ये स्थान मिळवलेली वास्तू आहे. नवीन वास्तू उभी राहिली आणि आता आम्ही लोक जेव्हा पार्लमेंटमध्ये जातो तुम्हाला एक खरंच सांगतो नव्या वास्तूत बसतो पण जुनी वास्तू हीच आपली आहे ही भावना सतत मनात असते. नव्या वास्तूच्या संबंधीची ती जवळीक अजून काही होईना.

 

मी स्वतः अनेक वर्ष संसदेत आहे. १९८४ साली मी पहिल्यांदा लोकसभेत आलो. तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हतो तर विरोधी पक्षात होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर निवडणुकीला विरोधकांमधले अनेक लोक उभे राहिला तयार नव्हते. एक वेगळं वातावरण होतं तरीही विरोधी पक्षाचंही काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही काही लोकांनी निवडणूक लढवायचं ठरवलं. मी निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडून आलो. राजीव गांधी प्रधानमंत्री झाले. प्रधानमंत्री राजीव गांधी ते आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले त्यांच्याशी आम्हा लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्नांवर मतभेद असतात, मतभिन्नता असते पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो राखायचा असतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला. लोकसभेत निवडून आलो आणि थोड्याच दिवसांमध्ये चित्र बदललं महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या आणि आमच्या सगळ्या विरोधकातल्या मित्रांनी सांगितलं तुम्ही स्वतः विधानसभेला उभे राहिला पाहिजेत नाहीतर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही आणि म्हणून मी जो १९८४ साली खासदार म्हणून निवडून आलो तो राजीनामा दिला आणि विधानसभेला उभा राहिलो. निवडूनही आलो. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास ६० आमदारांची शक्ती घेऊन आम्ही लोकांनी विधिमंडळाचं कामकाज सुरू केलं. बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते, त्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मध्ये एक काळ असा येऊन गेला की "काँग्रेस विचाराच्या लोकांनी एकत्र यावं" अशी भावना राजीव गांधी यांनी मांडली आणि आम्ही लोकांनी एकत्र बसून चर्चा केली आणि काँग्रेस विचाराचे लोक एकत्र करू लागलो. तेव्हा मी विधिमंडळ सदस्य होतोच आणि एके दिवशी मी गोव्याला असताना राजीव गांधींचा सकाळी चार वाजता फोन आला आणि म्हणाले "क्या कर रहे हो?" मी म्हटलं चार वाजलेत झोपलोय. ते म्हणाले "आप जल्दही दिल्ली आओ" आता लगेचच्या लगेच जाणं शक्य नव्हतं म्हटलं उद्यापर्यंत पोहोचतो. मग त्यांच्या घरी दिल्लीला पोहोचलो. राजीवजी आले समोर आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रात जायचंय. मी म्हटलं,

तुम्ही काय म्हणताय ते मला नेमकं समजलं नाही" त्यांनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्या असं अचानक सांगितलं होतं. मग मी विचारलं "पण का? कोण सहकारी असणार ?" ते म्हणाले "ते बघू नंतर, तुम्ही जाऊन शपथ घ्या आणि ती शपथ घेतल्यानंतर पुन्हा आपण बसून ठरवू." झालं, बाबासाहेब भोसले यांची सुट्टी झाली आणि मला मुख्यमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. नंतर १९८९-९० पर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.

 

१९९१ ला राजीव गांधींची हत्या झाली. चित्र बदललं. सगळ्यांनी बसवून ठरवलं कि काही सीनियर लोकांनी निवडणुकीला उभं राहावं. त्यात मलाही सांगण्यात आलं होतं. माझी काहीच तयारी नव्हती. ती बैठक इथेच दिल्लीला झाली होती. त्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पदाला, पक्षाचे नेतृत्व करायला दोन-तीन लोकांची नावं शॉर्टलिस्ट झाली होती. त्याच्यात मीही एक होतो. पण शेवटी निर्णय नरसिंह रावांच्या बाजूने लागला. मला १५८ मतं मिळाली आणि ननरसिंह रावांना काहीतरी १९० आणि काही अधिक मत मिळाली. नरसिंह राव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं माझ्या मंत्रिमंडळात तुम्ही हवे आहात आणि संरक्षण खात्याचे काम माझ्याकडे आलं. दोन वर्षे इथे दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्रात दंगल उसळली. मुंबईत आग लागली होती. चार-पाच दिवसानंतर प्रधानमंत्री नरसिंह रावांनी मला बोलावून घेतलं आणि मला सांगितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई पेटते हा संदेश भारताच्या दृष्टीने जगात अजिबात चांगला जात नाही आहे. सुधाकररावांच्या हातून सूत्र काढली पाहिजेत आणि लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही परत महाराष्ट्रात जा. माझी परत जायची इच्छा नव्हती पण त्यांनी आणि एन के पी साळवी यांनी फार भावनिक आग्रह केला की, "महाराष्ट्र मुंबई ही जर टिकली नाही, सावरली नाही तर कशासाठी आपण राजकारण करतो? कुणासाठी करतो?" मला परत जावं लागलं तेव्हा राज्य मी सावरलं आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना साधारणतः माहिती आहेच. पण या सगळ्या प्रसंगांमध्ये एका बाजूला महाराष्ट्राचं राजकारण होतं आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली होती.

 

दिल्लीत असण्याचं वैशिष्ट्य.. ज्यांच देशाला योगदान आहे अशा अनेक व्यक्तींचा इतिहास समजून घेता येतो, काहींचा जवळून संपर्क येतो. दिल्लीच्या संसदेमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये संसदेच्या ग्रंथालयामध्ये जाणं व्हायचं, पार्लमेंटची लायब्ररी अतिशय चांगली आहे. अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल चर्चा करणं माहिती घेणं, वाचन करणं हे काम आम्ही कटाक्षाने करत असू. त्यातून अनेक गोष्टी कळल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ राज्यघटनेपुरती सिमित नव्हते त्यांचं या देशासाठी प्रचंड असं योगदान आहे. स्वातंत्र्याच्या आधी पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये बाबासाहेब मंत्री होते. त्यांच्याकडे वीज आणि जल सिंचन, संसाधनं खातं होतं. आज देशांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं की लोक फक्त संविधानाचाच उल्लेख करतात. संविधानाबद्दलचं त्यांचं योगदान प्रचंड आहेच त्याबद्दल काही दुमतच नाही पण या देशाची आर्थिक उन्नती करायची असेल तर काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला आणि त्यांच्याकडे जी खाती होती त्यातून त्यांनी दोन तीन गोष्टी केल्या देखील. त्यांनी या देशांमध्ये पावसाचा पडणारा थेंब नि थेंब हा साठवला नाही तर शेती संपन्न होणार नाही, उद्योगधंदे वाढणार नाहीत आणि हे करायचं असेल तर धरणे बांधली पाहिजे असा विचार मांडला. त्यातून भाक्रा नांगल, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यासंबंधीचे धोरणात्मक निर्णय स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी घेतले. बाबासाहेब कामगार मंत्री होते. कष्ट करणाऱ्या कामगार वर्गाला अधिकार असले पाहिजे, आठवड्याची सुट्टी असली पाहिजे यासंबंधीचे निर्णय आणि अनेक कामगारांचे कायदे हे बाबासाहेबांनी केले. हे बाबासाहेबांचे योगदान आपण कधी विसरू शकत नाही. 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा' या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे. अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांचे प्रचंड योगदान होतं. मग ते सत्ताधारी पक्षात असोत की विरोधी पक्षात असोत.

 

पं. जवाहरलाल नेहरूंशी आमचा थेट संसदीय संबंध आला नाही पण ऐकून माहित होतं, जवळच्या लोकांकडनं समजून घ्यायला मिळत होतं. कधी संसदेत आल्याच्या नंतर गॅलरीमध्ये बसल्यावर त्यांची भाषणं ऐकण्याची संधी मिळायची आणि त्या वेळेला विरोधी पक्षांमध्ये महाराष्ट्रातले काही अत्यंत कर्तुत्ववान लोक होते. त्यामध्ये बॅरिस्टर नाथ पैंचा उल्लेख करावा लागेल, मधु लिमये यांचा विचार करावा लागेल, नंतर मधू दंडवते आले, जॉर्ज फर्नांडिस आले अशी ही मोठी मालिका आहे आणि यांचा स्थान काय याची प्रचिती यायची. मला आठवतंय एके दिवशी मी गॅलरीमध्ये बसलो होतो बॅरिस्टर नाथ पै हे संसदेत बसलेले होते. जवाहरलाल नेहरूही होते आणि जवाहरलाल नेहरू सभागृहातून उठून बाहेर निघाले आणि त्यावेळेला नाथ पैं चा नंबर आला. नाथ पै उभे राहिले बोलायला ऐन जे पं. नेहरू सभागृहातून बाहेर जात होते ते पंडितजी नाथ पैंच नाव ऐकलं परत फिरले आणि नाथ पैं च संपूर्ण भाषण ऐकलं आणि ते बाहेर गेले. या देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्यांनी आपल्या सहभागाने प्रचंड असा ठसा प्रस्थापित केला अशांची जी मालिका आहे, त्यामध्ये नाथ पै हे नाव कटाक्षाने घ्यावा लागेल. असे अनेक लोक होते त्या प्रत्येकाचा काही ना काही तरी योगदान आहे. मी मगाशी जी नावं सांगितली ती नावं महाराष्ट्रातील होती पण महाराष्ट्राच्या बाहेरच्याही अनेक लोकांनीही या देशाच्या संसदेला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्यामुळे ही संसद आणि त्या संसदेमध्ये योगदान देणाऱ्यांचं चित्र नव्या पिढीसमोर मांडणे हे कुलकर्णींनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलंय.

 

अनेक संदर्भ या पुस्तकात आहेत विलंब होईल म्हणून सविस्तर सांगत नाही पण अनेक संसदपटू होते. त्यातल्या अनेकांची नोंद या देशातल्या मीडियाने, लेखकांनी घेतलेलीच नाही. मुंबईमध्ये स. का. पाटील यांचा 'मुंबईचे अनभिषिक्त राजे' असा लौकिक होता. हे नाव अलीकडे लोकांना माहीत नाही पण देशाच्या पार्लमेंटमध्ये, केंद्र सरकारमध्ये प्रचंड ठसा प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेले जे काही महाराष्ट्राचे घटक होते त्यामध्ये स. का. पाटील यांचा उल्लेख हा करावा लागेल. कोकणातल्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असे स. का. पाटील नंतर मुंबईत आले आणि मुंबईची सर्व सत्ता त्यांच्या हातात होती, सबंध मुंबईचं राजकारण हे त्यांच्या मुठीत होतं. त्यांचा निवडणुकीत पराभव होऊ शकतो हा विचार सुद्धा कोणाच्या डोक्यात यायचा नाही. पण जॉर्ज फर्नांडिस हे त्या वेळेला कार्यकर्ते म्हणून मुंबईत काम करत होते त्यांनी सबंध मुंबईमध्ये प्रचार केला "यू कॅन डिफिट पाटील" "तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता" आणि एक वातावरण तयार केलं आणि अक्षरशः मुंबईचे अनभिषिक्त राजे स. का. पाटील पराभूत झाले आणि तिथे जॉर्ज फर्नांडिस निवडून आले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा इतिहास मोठा आहे. ज्यामुळे नवी दिशा मिळाली, देशाचा चित्र बदललं, सरकारं आली, सरकारं गेली.

 

माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचे सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एक मताने मंजूर झाला. आता ते जे एक मत होतं ते मी मिळवलं होतं. कसं मिळवलं ते मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो आणि सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्या वेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती, हा इतिहास आहे. अनेक गोष्टी आहेत त्याबद्दलचा उल्लेख करायचा प्रयत्न हा कुलकर्णींनी केला आहे पण अशा काही घटनांची पुस्तकात आणखी भर घालण्याची आवश्यकता आहे. आणि ती भर घालायची असेल तर एकदा तुम्ही, आम्ही आणि संजय राऊत बसुया आणि त्यामध्ये कुठलीही बाजू न घेता वास्तव चित्र हे आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करूया.

 

गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. आज सकाळपासून एकच बातमी पाहतोय कि, "हे दोघं भेटणार." मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचाराचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.

 

मी सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं. सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे आणि त्याचे उत्तरही आम्ही त्या पद्धतीतूनच द्यायचो. ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा. मला ते शरद बाबू म्हणत. फोनवर बाळासाहेब म्हणायचे "शरद बाबू मी येऊ भेटायला की तुम्ही येताय?" बोलावून घ्यायचे आणि भेटीत काल काय बोललो, काय लिहिलं याबद्दल यकिंचितही शल्य मनामध्ये कधी ठेवायचं नाहीत. अगत्य, आस्था, व्यक्तिगत सलोखा हा कधीही कमी झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेकांची नावे घेता येतील. हे सगळे या संसदीय इतिहासातील घटक आहेत आणि त्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न निलेशकुमार कुलकर्णी यांनी केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो.