IMG-LOGO
Home राजकारण जवळा गावच्या सरपंचपदी सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड ; खुल्या जागेवर मागासवर्गीय सरपंच करून दिपकआबांनी घालून दिला सामाजिक समतेचा आदर्श
राजकारण

जवळा गावच्या सरपंचपदी सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड ; खुल्या जागेवर मागासवर्गीय सरपंच करून दिपकआबांनी घालून दिला सामाजिक समतेचा आदर्श

February 2025 130 Views 0 Comment
IMG

जवळा गावच्या सरपंचपदी सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड ; खुल्या जागेवर मागासवर्गीय सरपंच करून दिपकआबांनी घालून दिला सामाजिक समतेचा आदर्श 

 

सांगोला : तालुका प्रतिनिधी 

सांगोला तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असणाऱ्या जवळा ता सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवळा गावचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असतानाही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बौद्ध समाजातील सुशिक्षित तरुण सहकाऱ्याला स्वतःच्या गावाचा बिनविरोध सरपंच बनवून एक वेगळाच सामाजिक आदर्श सांगोला तालुक्यासमोर निर्माण केला आहे. 

जवळा ता सांगोला या गावातूनच सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. माजी आमदार आणि काकासाहेबांचे सुपुत्र दिपकआबा साळुंखे पाटील यांनीही जवळा गावातूनच आपली राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती. त्यामुळे जवळा हे गाव सांगोला तालुक्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते. गतवेळी पार पडलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. जवळा सारख्या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गावात सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असतानाही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पहिल्या वर्षी धनगर समाजातील महिला सविता दत्तात्रय बर्वे यांची सरपंचपदी निवड केली होती. एका इतर मागास प्रवर्गातील महिलेला स्वतःच्या गावात सरपंच केल्याने दिपकआबांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. यानंतर सौ सुषमा घुले यांना जवळा गावच्या सरपंच होण्याचा बहुमान मिळाला होता. सौ सुषमा घुले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळा येथे निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी सज्जन मागाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सज्जन मागाडे यांची जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

सरपंचपदी निवड होताच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जवळा गावात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सर्व सदस्यांनी नूतन सरपंच सज्जन मागाडे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा जपणाऱ्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनीही कधीच जातीपातीला थारा दिला नाही. आज दिपकआबांच्या याच राजकीय दूरदृष्टीमुळे जवळा गावाला प्रथमच दलीत सरपंच लाभला आहे. आमचे नेते दिपकआबांनी जो विश्वास आपल्यावर दर्शवला आहे तो नक्कीच सार्थ ठरवून आबांच्या नेतृत्वात गावाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेन

मा सज्जन मागाडे 

नूतन सरपंच, जवळा.