‘टेक्नो-सोसायटल २०२४’ सारख्या परिषदा वारंवार व" />
पंढरपूर प्रतिनिधी
‘टेक्नो-सोसायटल २०२४’ सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे संशोधक विद्यार्थ्यांना नवनिर्मिती करण्यासाठी चालना मिळाली असून अशा परिषदा वारंवार व्हाव्यात. त्यामुळे संशोधनास अधिक गती मिळेल व भविष्यात भारतीय संशोधनामध्ये प्रगती होऊ शकेल. स्वेरीला येणे ही नेहमीच सन्मानाची बाब असते. स्वेरीला ही माझी तिसरी भेट आहे. सर्व विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांना भेटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वेरीचे आभार! ज्ञानाची देवाणघेवाण होण्यासाठी अशा कॉन्फरन्सची आवश्यकता असते.’ असे प्रतिपादन आयआयटी जोधपुरच्या डॉ. साक्षी ढाणेकर यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या सहकार्याने पीएम- उषा या योजनेअंतर्गत आयोजिलेल्या पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ च्या समारोप प्रसंगी आयआयटी जोधपुरच्या डॉ. साक्षी ढाणेकर ह्या मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. सुरवातीला ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ चे समन्वयक डॉ. अमरजित केने यांनी दोन दिवस चाललेल्या परिषदेमधील विशेष नोंदी, सहभागी स्पर्धक, सादर केलेले पोस्टर्स, मागील चारही परिषदेच्या तुलनेत यंदा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, संशोधक पाहुण्यांची रेलचेल, नियोजन करताना झालेली तारेवरची कसरत आदी लक्षवेधी बाबींवर प्रकाश टाकला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ या परिषदेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल विविध देशांतून, भारताच्या विविध राज्यांतून आलेले संशोधक, प्राध्यापकांचे आभार मानले. आपल्या सहभागामुळे ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी झाली असून यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य केल्याचे सांगितले. भविष्यात स्टार्टअप, स्कील इंडीया, मेकइन इंडीया, प्रोडक्ट डेव्हलपमेंट असे विविध प्रकल्प व योजना वेग घेतील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी प्रमोद मलिक (भुवनेश्वर), डॉ. रामदास बिरादार (पिंपरी चिंचवड), शिवानी कांबळे, प्रा. ए. आर. शेलार या संशोधक स्पर्धकांनी परिषदेच्या उत्तम नियोजनाचे कौतुक केले. या परिषदेच्या माध्यमातून नवनवीन बाबी शिकण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वेरी ग्रामीण भागात असूनही शहराला लाजवेल असे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. एचसीएल कंपनीचे योगीराज दामा म्हणाले की, ‘अशा स्पर्धेमुळे संशोधक मनापासून व पोटतिडकीने परिश्रम घेवू लागतो व अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर करतो आणि यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होतो.’ अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले की, ‘‘टेक्नो-सोसायटल २०२४’ च्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांमध्ये आपण नवनवीन विचार शेअर केले, नाविन्यपूर्ण उपाय शोधले आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक आव्हानांना कसे सामोरे जावे यावर विचारमंथन केले. या परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रगत संशोधनाला वास्तव जगाच्या वापरांसोबत जोडले गेले. आपल्या सक्रिय सहभागाने आणि मोलाच्या योगदानाने हा उपक्रम शैक्षणिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन एक प्रभावी चर्चासत्र मंच बनला आहे. पंढरपूर ही आध्यात्मिकतेची पवित्र भूमी आहे, आणि ह्या परिषदेमुळे विचारशीलता, बौद्धिकता व तांत्रिक सहकार्यासाठी एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे. डॉ. रोंगे सरांच्या समर्पणामुळे आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अथक मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तरुण पिढीचा वाढता सहभाग या परिषदेत सिद्ध झाला. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर टाकण्याबरोबरच, व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी भक्कम पाया रचला आहे. वैज्ञानिक, अभियंते, धोरणकर्ते आणि नवनिर्माते यांच्यातील सहकार्याने प्रत्यक्ष जगातील समस्यांवर उत्तरे मिळविण्याचे महत्त्व या परिषदेत अधोरेखित झाले आहे'. यावेळी पोस्टर स्पर्धेत शिल्पा पाटील (व्हीआयटी, पुणे), डॉ. तृप्ती बनसोडे (फॅबटेक, सांगोला), अमोल भोसले, (आरव्हीआयटीएम, बेंगलोर), प्रमोदकुमार मलिक, (केआयआयटी, भुवनेश्वर), योगेश जाधव (पू.अ.हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्यासह अनेक युवा संशोधकांनी बक्षिसे पटकाविली. यावेळी पाहुण्यांकडून परिषदेत सहभागी झाल्याबद्धल प्रमाणपत्रे देण्यात आली. पहिल्या दिवशी सायंकाळी राजू पुरंदरे यांच्या ‘स्वर-संध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून नव्या, जुन्या हिंदी, मराठी गीते सादर करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बाहेरून आलेल्या पाहुण्यांची चांगली करमणूक झाली. एकंदरीत ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि भविष्यकालीन संशोधन या सर्व बाबतीत मोलाची ठरली हे मात्र निश्चित! ‘टेक्नो-सोसायटल २०२४ ही पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या सर्वच सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. एमबीएच्या डॉ. मिनल भोरे यांनी सूत्रसंचालन केले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी आभार मानले.