गौरी गणपतीच्या आगमनाने घरोघरी उत्साही वातावरण
सांगोला (तालुका प्रतिनिधी): लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आणि आनंदात आगमन झाले असून गणपती पाठोपाठ आलेल्या गौराईच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणीत झाला. त्यामुळेच माहेरवाशिण गौराईचेही अगदी थाटामाटात स्वागत झाले. लाडक्या गौराईंच्या पाहुणचारासह तिचे गोडकौतुक करण्यात कोणतीच कसूर राहू नये, यासाठी महिलावर्गाने कंबर कसून खास तयारीही केली आहे. तिच्या नैवेद्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या तयार आहेतच. त्याबरोबरच तीन दिवस मुक्कामी राहणाऱ्या गौराईचे आवडते पदार्थ तिच्यासाठी खास सुग्रास जेवणाचा पारंपरिक बेतही गृहिणींकडून आखण्यात आला.
गौराईच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या भाज्या, खिरींसह मोदक, करज्यांचीही बडदास्त ठेवण्यात आली आहे. गौराईला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी पुरणपोळी, नारळाच्या उकडी करंज्या, तांदळाची खीर बनवली जाते. याशिवाय सात किवा ११ प्रकारच्या भाज्यांपासून बनविलेली मिक्स भाजी सोबत वरण-भात असे भरगच्च जेवण गौराईच्या आवडी-निवडी जपत केले जाते. तिसऱ्या दिवशी गोराईला निरोप देताना वरण-भात, दोन प्रकारच्या भाज्या, गव्हाची गुळामध्ये केलेली लापसी यांचा गौराईला नैवेद्य दाखविला जातो. याशिवाय रोज मोदकही असतातच.
गौराई पहिल्या दिवशी येते तेव्हा ती प्रवास करून आलेली असते म्हणून तिला साधा भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यातही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि शेपू, मेथी किंवा अंबाडीची भाजी, वरण-भातही असतोच. दुसऱ्या दिवशी मात्र गौराईसाठी खास पंचपक्चान केले जातात. पुरणपोळी बरोबरच कटाची आमटी, अळूची वडी, बटाट्याची भजी, कोशिबिरी, दोन-तीन प्रकारच्या चटण्या, पाच पदार्थाचे पंचामृत, चणा डाळ, मिरची, याबरोबरच अन्य पदार्थ तयार केले जातात.
शिवाय, गौराईच्या आवडीचा साखर भात, लाडू, करंजी, श्रीखंड असतेच. तिसऱ्या दिवशी गौराईला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य दाखविला जातो. विशेष म्हणजे ग्रामीण भागात गणपती- गौरी यांच्या आगमनापासून ते त्यांच्या विसर्जनापर्यंत त्याची हरप्रकारे बडदास्त ठेवली जाते. त्यांच्या स्वागतापासून ते सजावटीपर्यंत आणि नैवेद्यापासून ते प्रसादापर्यंत यांच्यातही खास परंपरा उत्साहाने आणि आनंदाने जोपासल्या जातात.