महागाई, कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे

महागाई, कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे
IMG-LOGO
Home संस्कृती महागाई, कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे
संस्कृती

महागाई, कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे

September 2021 198 Views 0 Comment
IMG

महागाई, कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी गणरायाला साकडे

सांगोला तालुक्यात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान

सांगोला (तालुका प्रतिनिधी): ना ढोल-ताशा, ना झांज पथकाचा गजर, ना बॅण्ड- बेंजोचे वादन, केवळ गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया च्या गजरात उत्साहाला आवर घालत सांगोलावासिसांनी लाडक्या विघ्नहर्त्याची उत्साहात प्रतिष्ठापना केली. शहरातील गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे सकाळपासूनच गणेशभक्तांची लगबग दिसून आली. आपल्या आवडीची गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी विविध स्टॉलला भेट देण्याचा आग्रह बाल गणेश भक्तांकडून होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आपल्या पसंतीची मूर्ती खरेदी केल्यानंतर गणपती बाप्पा मोरया च्या जल्लोषात घरोघरी गणरायाचे भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. महागाई, कोरोनाचे हे संकट दूर होऊ दे. आमच्या संसाराची घडी पुन्हा नीट होऊन आर्थिक विवंचना दूर होऊ दे.. हे साकडे घालत घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाला.

 

        गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळानी ढोल ताशा किंवा डॉल्बी स्पीकर न लावता शांततेत मूर्तींची प्रतिष्ठापना केली. श्रीगणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांनी बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक आदी ठिकाणी वाहन बंदी केली होती. त्यामुळे गणेशभक्तांना मूर्ती खरेदी करताना गर्दी न होता मोकळेपणाने वावरता आले. गणेश पूजेसाठी आवश्यक असणारे फुलांचे हार, नारळ, प्रासादिक वस्तू, अगरबत्ती आदी साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली. आपल्या लाडक्‍या बाप्पाचे आगमन झाल्यामुळे बाल गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत असून पुढील दहा दिवस गणेशोत्सव उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांनीही कोरोनाचं भान ठेवून स्वतःहून उत्साहावर मर्यादा घालून बहुतांश ठिकाणी मंदिरात, खासगी जागेत मूर्तींची प्रतिष्ठापना केली. 

 

        वाद्यांच्या तालावर सांगोला शहर व परिसरात लाडक्या गणरायाचे उत्साहात, भक्तीमय वातावरणात दरवर्षी आगमन होत असते. घरगुतीसह सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाच्या मूर्तींच्या आगमनासाठी अबालवृध्दांत मोठा उत्साह दिसून येतो. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्या उत्साहावर विरजण आले आहे. मागील वर्षी तर फारच कडक नियमांत उत्सव साजरा करावा लागला. यंदा मात्र थोडी शिथिलता आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असल्याने पहिल्यासारखा उत्साह दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळी सहापासूनच घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली. बच्चेकंपनीकडून गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा देत श्रीगणेशाचे स्वागत करून आपापल्या घरांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. तसेच मिठाई तसेच फूलहारांच्या खरेदीसाठी झुंबड दिसून आली. एकूणच शहरातील गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने साजरा होत असला तरी गणेशाच्या स्वागताचा जोश मात्र सगळीकडे पाहण्यासारखा होता.