कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू ; कारवाई ची मागणी
IMG-LOGO
Home राजकारण कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू ; कारवाई ची मागणी
राजकारण

कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू ; कारवाई ची मागणी

November 2023 561 Views 0 Comment
IMG

कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू

कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या जनावरांना चारा दिला नसल्यामुळे मृत्यू झाला ; संबंधितावर कारवाई करावी

सांगोला / प्रतिनिधी:
मोकाट जनावरांवर नगरपालिकेने कारवाई करून कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या म्हशीच्या (रेडुक) पिलाचा मृत्यू झाला. मागील चार दिवसापासून कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या जनावरांना चारा दिला नसल्यामुळे जनावराचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत, सदर म्हशीच्या पिलाचे पोस्टमार्टम करून त्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करावी तरच म्हशीचे मृत पिल्लू हलू देणार असा पवित्र जनावरे मालकांनी घेतला. दरम्यान प्रशासनाने जनावरे मालकांशी व उपस्थितांशी चर्चा करून सावरा - सावरी केली आणि मृत पिलांची विल्हेवाट लावली. दरम्यान हा वाद शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला. कारवाईसाठी आणलेल्या जनावरांना नगरपालिका प्रशासन चारापाणी देणार आहे की नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. पैशापोटी डांबून ठेवलेल्या जनावरांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल जनावरांच्या मालकांनी नगरपालिका प्रशासनाला विचारला.
सांगोला शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मोहीम सांगोला नगरपालिकेने मागील चार ते पाच दिवसापासून राबवली आहे. यामध्ये सुमारे दहा ते बारा जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. यापैकी दोन-तीन जनावरे दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये विनोद विक्रम बनसोडे यांच्या म्हशीच्या पिलाला देखील कारवाई पोटी कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. त्या म्हशीच्या पिलाचा नगरपालिकेच्या कोंडवाड्यात मृत्यू झाला. यामुळे शुक्रवरी सकाळपासूनच नगरपालिकेसमोर जनावर मालकांनी गर्दी करत नगरपालिकेला जाब विचारला. छत्र नसलेल्या कोंडवाड्यात अस्वच्छतेमुळे जनावरांचा कोंडमारा होत आहे. नगरपालिकेने ताब्यात घेतलेली जनावरे न्याय प्रविष्ठ आहेत. त्यामुळे पकडण्यात आलेली जनावरे कोंडवाड्यातच श्‍वास घेत आहेत. अस्वच्छतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 7 जनावरांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित कोंडवाड्यातील जनावरे मोकळा श्‍वास कधी घेतील, असा प्रश्‍न स्थानिकांकडून विचारला जात आहे.
नगरपालिका कोंडवाडा रक्षकाचे कुठलेही पद मंजूर नाही. पालिकेच्या सफाई कामगारांकडूनच जनावरांना चारा, पाण्याची सोय केली जाते. मात्र, सध्या जनावरांची सोय करण्यास सफाई कामगारांना नाकीनऊ येत आहे. पलिकेकडे स्वतंत्र कोंडवाडा नाही. पर्यायाने कोंडवाडा रक्षकाचे पद नाही. परिणामी गोवंशाचे हाल होत आहेत. पालिकेच्या कोंडवाड्यात अपुऱ्या सोयीमुळे गुरांची आबाळ होत असल्याचे चित्र आहे.


माझी दोन जनावरे न.पा. सांगोला प्रशासनाने कोंडवाडयात टाकली होती. सदर जनावरांचा दंड भरून जनावरे घेवून जाण्यास सांगितले. मी दंड भरण्यास तयार असताना मला वाढीव रक्कम मागितली त्यामुळे मी जनावरे घेवून गेलो नाही. परंतू सदर जनावरे कोंडवाडयात असताना त्यांनी जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा पाणी दिला गेला नाही. त्यामुळे एका जनावराचा मृत्यू झाला आहे. तरी सदर मयत जनावरांचे पोस्टमार्टम होवून संबंधीतावर कायदेशिर कारवाई करावी. याबाबत मा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मा. विनोद बनसोडे सांगोला