रत्नागिरी-नागपूर महामार्ग अपघातांच्या विळख्यात.. ! 

रत्नागिरी-नागपूर महामार्ग अपघातांच्या विळख्यात.. !
IMG-LOGO
Home सामाजिक रत्नागिरी-नागपूर महामार्ग अपघातांच्या विळख्यात.. !
सामाजिक

रत्नागिरी-नागपूर महामार्ग अपघातांच्या विळख्यात.. !

November 2022 265 Views 0 Comment
IMG

रत्नागिरी-नागपूर महामार्ग अपघातांच्या विळख्यात.. ! 

रस्ता सुरक्षा समिती कागदावरच, सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष ?

सांगोला (तालुका प्रतिनिधी): रत्नागिरी-नागपूर, पंढरपूर-मल्हारपेठ, सांगोला-पंढरपूर या हायवेवर दररोज एखादा अपघात होत असून वर्षभरात शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो नागरिक जखमी, जायबंदी झाले आहेत. वारकऱ्यांच्या दिंडीला कार घुसल्याने सात वारकऱ्यांना जीव गमवावा लागल्याने हायवेवरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग येईल असं वाटत असताना अजूनही या महामार्गावर जी अपघात स्थळे घोषित आहेत त्याबाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना अद्यापही केल्या नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे या अपघात स्थळांवर अजून अपघात घडण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्रशासन पाहतंय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

           सांगोला तालुक्यातून गेलेल्या रत्नागिरी- नागपूर, पंढरपूर- मल्हारपेठ, सांगोला-पंढरपूर या हायवेवर कुठेही गतिरोधक बसविले नाहीत. तसेच रस्त्यावर कुठेही वेग नियंत्रण, दिशादर्शक फलक किंवा वेगाची मर्यादा किती असावी याची वाहनधारकांना सूचना किवा फलकाद्वारे माहिती दिली नाही. परिणामी, महामार्गावर वेगाला मर्यादाचं उरली नसून, वाहनाधारक हे कोणत्याही नियमांचे पालन न करता आपले वाहन सुसाट वेगाने मर्यादेच्या बाहेर पळवित आहेत. परिणामी हा महामार्ग वाहनधारकांच्या जिवावर उठला असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. महामार्गावरील बहुतांशी चौकांमध्ये गतिरोधक नाहीत. 

         रत्नागिरी-नागपूर, पंढरपूर-मल्हारपेठ, व सांगोला- पंढरपूर असे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आले. मात्र, सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. या महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. महामार्ग बनल्यानंतरही या रस्त्यावरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महामार्गावर प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरील दुर्लक्षामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यस्थितीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने हा महामार्ग आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

 

रस्ता सुरक्षा समिती कागदावरच...

 

अपघातप्रवण ठिकाणे कमी होण्यासाठी जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. मात्र, वाढते अपघात अन्‌ मृत्यूची संख्या पाहता ही समिती नुसती कागदावरच कार्यरत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच ठिकाणी सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्‍चित करून ब्लॅक स्पॉट घोषित केला जातो. त्यानंतर तेथे ठोस उपाययोजना करून अपघात होऊ नयेत, असे नियोजन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. एकीकडे बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आरटीओ, वाहतूक पोलिस असो की महामार्ग विकास प्राधिकरण, यांच्याकडून काहीच ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.