IMG-LOGO
Home सामाजिक सांगोल्यातील ६३ हजार ज्येष्ठांनी केला लालपरीतून मोफत प्रवास..!
सामाजिक

सांगोल्यातील ६३ हजार ज्येष्ठांनी केला लालपरीतून मोफत प्रवास..!

October 2022 77 Views 0 Comment
IMG

सांगोल्यातील ६३ हजार ज्येष्ठांनी केला लालपरीतून मोफत प्रवास..!

 

सांगोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शिंदे-फडणवीस सरकारने २६ ऑगस्टपासून एसटी बसमध्ये राज्यात सर्वत्र मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. शासनाचा निर्णय व लालपरीतील या प्रवासाला ज्येष्ठांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबर अखेर सांगोला तालुक्यातील ६३ हजार २२७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रभारी सांगोला आगार प्रमुख राहुल देशमुख यांनी दिली.

         सांगोला तालुक्यात रोज सरासरी दोन हजारांवर नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेचा प्रवास करून फायदा घेत आहेत. विरोधक व सोशल मीडियावर ट्रोल होणारी ही योजना ज्येष्ठांनी यशस्वी करून दाखविली आहे. या योजनेमुळे ज्येष्ठांना दिवाळीत कुटुंबासह गावी, पर्यटन स्थळे, देवदर्शन यांसह नातेवाइकांकडे विविध ठिकाणी फिरायला जाण्यास मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्टला अमृत ज्येष्ठ नागरिक ही योजना जाहीर केली. यामुळे राज्यात २६ ऑगस्टपासून लालपरीतून ज्येष्ठांना मोफत प्रवास लाभ मिळू लागला.

       एसटी महामंडळाच्या सांगोला आगारातून शहरासह ग्रामीण भागात दररोज ५० बसेसच्या माध्यमातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास केला जात असून २० हजार प्रवाशांची चढ उतार करून जवळपास ५ लाख २९ हजार १९४ रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळत आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक ही योजना ज्येष्ठांना वरदान ठरली आहे. आतापर्यंत सांगोला आगारातून ६३ हजार २२७ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत मोफत प्रवास केला आहे. या योजनेसाठी एसटी महामंडळाला जवळपास ३१ लाख १९ हजार १७६ रुपयांचे उत्पन्न सोडावे लागले असल्याने या योजनेमुळे वृद्धांना अच्छे दिन आले आहेत. एसटी बस ही ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्याचे हक्काचे वाहन आहे. या योजनेमुळे ज्येष्ठांना पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरात दवाखाना व इतर कामांसाठी जाणे सोपे झाले आहे.