अपक्षांच्या धडाकेबाज प्रचाराने अनेकांची डोकेदुखी वाढली
सांगोला प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आघाड्या बिघडले ले गणित यांनी चिन्हांचा झालेला गोंधळ यांमुळे अनेकांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे त्यांनाच अनेक अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याची दिसून येत आहे.
स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य, घराघरांत सातत्याने भेटी, आणि राजकारणापेक्षा कामाला प्राधान्य देणारी भूमिका यामुळे अपक्ष उमेदवारांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, फुटके रस्ते, नाल्यांची दुरवस्था या सर्व प्रश्नांवर अपक्ष उमेदवारांनी नेमकेपणाने बोट ठेवत जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षीय नेत्यांच्या मोठ्या सभा आणि घोषणा जशाच्या तशाच राहिल्या असताना अपक्ष उमेदवारांच्या जमिनीवरच्या मोहिमा अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभागात घरोगरी संपर्क, प्रभावी भाषणे, मुद्देसूद नियोजन, स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवारांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत प्रभागांतील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते-विजेचे प्रश्न, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर अपक्ष उमेदवार थेट संवाद साधत असून मतदारांशी जवळीक वाढवत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारांची ही आक्रमक रणनीती पाहता प्रभागातील लढत अत्यंत रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही प्रभागात तर अपक्ष उमेदवारच आघाडीवर असल्याच्या कुजबुजांनी पक्षीय गोट्यात चिंता वाढली आहे.
अपक्षांनी वाढती ताकद ,पक्षांतर्गत नाराजी ,प्रभाग निहाय झालेले बदल आणि प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ यामुळे सांगोला नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार बनली आहे.यामध्ये पक्षीय प्रतिष्ठा की अपक्षांचा प्रभाव याची खरी प्रतिक्षा असणार आहे.मतदाराचा कल आणि अंतिम क्षणाची राजकीय गणिते यामुळे गणित पलटी होण्यास शक्यता नाकारता येत नाही.