राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा- डॉ.अनिकेत देशमुख राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा - डॉ अनिकेत देशमुख
IMG-LOGO
Home राजकारण राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा - डॉ अनिकेत देशमुख
राजकारण

राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा - डॉ अनिकेत देशमुख

November 2023 45 Views 0 Comment
IMG

राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा- डॉ.अनिकेत देशमुख

 

सांगोला(प्रतिनिधी):-दूध दराला लागलेल्या घरघरीने दूध उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करून लवकरात लवकर दुधाचा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करू लागले आहेत. एकीकडे शेजारच्या राज्यांमध्ये दूध उत्पादकांच्या पाठीशी राज्य सरकारे ठामपणे उभी असताना महाराष्ट्रातील राज्य सरकारने मात्र दूध उत्पादकांना वार्‍यावर सोडून दिलं आहे काय? अशी शंका येऊ लागली आहे. राज्य सरकारने दूध प्रश्न निकाली लावावा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिला आहे.

 

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे दूध चारा, पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगविण्याची चिंता निर्माण झालेली असताना खासगी व सहकारी दूध संघचालकांनी संगनमत करून दुधाचे दर पाडले आहेत. चार ते पाच महिन्यांत सुमारे 10 ते 11 रुपयांनी प्रतिलिटरचे दर खाली आहेत. दुधाचा दर निश्चित करण्यासाठी शासनाने चार महिन्यांपूर्वी समिती नियुक्ती केली.मात्र, त्या समितीने काहीही केले नाही. दुधाचे दर कमी करणे, रिटर्नचे दर वाढविणे असा मनमानी कारभार खासगी दूध संघांचा आहे. तरीही पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुधाची भेसळ मात्र राजरोस सुरू आहे.

दूध संघ आणि दूध कंपन्यांनी दुधाचे भाव पाडले असल्याचे शेतकरी सांगत असून दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा. दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राज्य सरकारने दूध दर प्रश्नी हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिला आहे.