मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुं" /> मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुंडन
IMG-LOGO
Home राजकारण मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुंडन
राजकारण

मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुंडन

October 2023 115 Views 0 Comment
IMG

मराठा आरक्षणासाठी स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातूने केले मुंडन


सांगोला - सध्या महाराष्ट्रभर सुरू असणाऱ्या सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाठींबा देत मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. शेतकरी कामगार पक्ष मराठा समाज बांधवांच्या पाठीशी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. सांगोला तालुक्यातही आरक्षणाच्या मागणीचा रेटा वाढत असताना कडलास (ता. सांगोला) येथील आमरण उपोषणाला बसलेले दीपक पवार यांची भेट घेत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवार (ता. 31) रोजी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी वाटेल ती किमत मोजायला तयार असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा व धनगर समाज हातात हात घालून जीवनमान जगत आहेत. इतर समाजाच्या तुलनेत या दोन्ही समाजांची लोकसंख्या अधिक आहे.

मात्र, पूर्वीपासूनच शेती, पशुपालन व्यवसायाशी हा समाज निगडित असल्याने शिक्षण, नोकरीपासून तो वंचित राहिला. त्यात आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नाही. त्यामुळे तो अतिमागास राहिला आहे. त्यामुळे मराठा व धनगर समाजाला कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायला हवे, या लढ्यात मी अग्रभागी असेन अशी ग्वाही डॉ. देशमुख यांनी यावेळी समाजबांधवांना दिली.

यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, नारायण बापू गायकवाड, जोतिराम काटकर, गजेंद्र गायकवाड, हणमंत गायकवाड, रमेश चव्हाण, संजय शेटे व चैतन्य गायकवाड या तरुणांनी आपले मुंडण करून मराठा आरक्षणासाठी विलंब करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत समाजातील शेकडो तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या हा आपल्यापुढील पर्याय नाही. आपण सरकारशी लढून आपल्या हक्काचे आरक्षण मिळवू. आरक्षणाच्या लढाईत ज्या तरुणांनी आपले जीवन समर्पित केले आहे अशा समाज बांधवांच्या कुटुंबीयांना सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मदत करावी अन्यथा राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल.

- डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना.