धनगर समाजाला आरक्षण द्या;पालकमंत्री विखे पाटलाच्या अंगावर " /> धनगर समाजाला आरक्षण द्या;पालकमंत्री विखे पाटलाच्या अंगावर उधळला भंडारा; भाजप शहराध्यक्षाकडून मारहाण
IMG-LOGO
Home राजकारण धनगर समाजाला आरक्षण द्या;पालकमंत्री विखे पाटलाच्या अंगावर उधळला भंडारा; भाजप शहराध्यक्षाकडून मारहाण
राजकारण

धनगर समाजाला आरक्षण द्या;पालकमंत्री विखे पाटलाच्या अंगावर उधळला भंडारा; भाजप शहराध्यक्षाकडून मारहाण

September 2023 99 Views 0 Comment
IMG

धनगर समाजाला आरक्षण द्या;पालकमंत्री विखे पाटलाच्या अंगावर उधळला भंडारा; भाजप शहराध्यक्षाकडून मारहाण

सोलापूर : धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिली.

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौर्‍यावर आहेत. आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना निवेदन द्यायला बंगाळे आले होते.

निवेदन वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकवून खिशातील भंडारा काढून पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर टाकला व घोषणा दिल्या. धनगर समाजाला 'एसटी'तून आरक्षण तत्काळ द्यावे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अशा घोषणा त्याठिकाणी देण्यात आल्या. पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा टाकल्याने भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षारक्षकांनी बंगाळे यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.

भाजपला परिणाम भोगावे लागतील

नरेंद्र काळे यांना भंडाऱ्याचा एवढा तिरस्कार का? म्हणत आमची सत्ता आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला जाईल, असे आश्वासन विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

या गोष्टीला आता दहा वर्षे उलटून गेली, तरीदेखील धनगर समाज बांधव संयमाने आपल्याला मिळणाऱ्या आरक्षणाची वाट बघत आहे. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते, आता धनगर समाजाच्या संयमाचा बांध फुटला आहे.

विद्यमान राज्यकर्त्यांकडून आरक्षण देण्यासाठी पद्धतशीर टाळाटाळ केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना एका समाजबांधवाचा भावनेचा उद्रेक होऊन त्यांनी भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर टाकला. यावेळी ज्याने धनगर समाजाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदाचा मान मिळवला, त्या नरेंद्र काळे यांनी वास्तविक पाहता या प्रकरणात सामोपचाराची भूमिका बजावणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यांनी समाज बांधवांवर हात उचलला.

लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा निषेध करतो यापुढे समाजापुढे येताना भारतीय जनता पार्टीने दहा वेळा विचार करून पुढे यावे. याप्रसंगी नरेंद्र काळे यांचे कृत्य म्हणजे 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' असाच म्हणावे लागेल. कोणत्याही समाजाचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर भाजपा सातत्याने करत असतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा कॉंग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला आहे.