पुणे (श्याम ठाणेद" />
हत्ती वाचवा पर्यावरण वाचवा
पुणे (श्याम ठाणेदार)
मागील सहा वर्षात ४७४ हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. २०१४ ते २०२० या कालावधीत देशातील ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. यातील सर्वाधिक घटना आसाम मध्ये घडल्या असून ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यातही अशा घटना घडल्या आहेत. ही माहिती धक्कादायक अशीच आहे कारण एकीकडे आपण हत्ती वाचवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत हत्ती वाचवण्याचे आवाहन करत आहोत तर दुसरीकडे हत्तींचा अशा प्रकारे मृत्यू होत आहे. अर्थात हत्तींना विजेचा धक्का लागला की लावला हे ही शोधायला हवे कारण हस्तिदंती वस्तूंसाठी तस्करांकडून हत्तीची शिकार केली जाते. एका अंदाजानुसार जगात दररोज १०० हत्तींची शिकार केली जाते. भारतातही हत्तींच्या शिकारीचे प्रमाण खूप आहे. जगातील ९० टक्के हत्ती आफ्रिका आणि आशिया खंडात आढळतात पण आता तेथील हत्तींचे प्रमाण घटू लागले आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलावर माणसाने केलेले आक्रमण, ग्लोबल वार्मिंग यासारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू करून तारेचे कुंपण शेती, माळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका बसून हत्ती मरत आहेत. आशिया खंडातील एकूण हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतात आहेत. जर अशाप्रकारे विजेचा धक्का लागून हत्ती मरू लागले तर भारतातील हत्तीही भविष्यात नामशेष होतील. जर पृथ्वीवरुन हत्ती नामशेष झाले तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होईल. हत्ती नामशेष झाल्यास पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड या वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. हत्ती कमी झाल्यास काय होईल यावरील संशोधन 'नेचर जियोसायन्स' या नियतकालिकात छापून आले आहे ते वाचून पर्यावरण व वन्यजीव प्रेमींनी 'हत्ती वाचवा' ही मोहीम हाती घेतली आहे. सर्वात बलवान आणि शाकाहारी जीव म्हणून हत्तीची गणना होते. प्रचंड आकारमानामुळे जंगलात ते बुलडोझर चे काम करतात. त्यांच्या चालण्यामुळे ते जंगलात नव्या वाटा तयार होतात. गवत आणि विविध वृक्ष वेलींच्या परागीभवनात हत्तींच्या हालचालींचा मोठा वाटा असतो. काहीवेळा ते वठलेली झाडे धक्के देऊन पाडतात. या सगळ्यांचा पर्यावरणावर परिणाम होतो. हत्तींमुळे जंगलातील झाडांची संख्या, कार्बन पातळी नियंत्रणात राहते. वेगाने वाढणाऱ्या वनस्पती हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढवितात. हत्ती अशा वेगाने वाढवणाऱ्या वनस्पतींची पाने खात असल्याने वातावरणातील कार्बन कमी होते. आफ्रिकेतील कांगो प्रजासत्ताकातील जंगलात संशोधन केले असता वरील निष्कर्ष निघाले. त्यामुळे हत्तींची संख्या वाढत राहिली तरच वातावरणात प्राणवायू जास्त राहील. कार्बनचे प्रमाण घटेल. त्यामुळे हत्ती वाचवणे ही काळाची गरज आहे. हत्ती वाचेल तरच पर्यावरण वाचेल.