तालिबान विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस भूमिका घ्यावी
पुणे (श्याम ठाणेदार)
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. इसिस या कट्टर अतिरेकी संघटनेने काबुल विमानतळावर केलेल्या हल्ल्यात १२० हुन अधिक जणांचा जीव गेला तर हजारो नागरिक जखमी झाले. या हल्ल्याला प्रीतिउत्तर म्हणून अमेरिकेने काबूलवर ड्रोन हल्ले केले त्यातही जीवितहानी झाली. त्याला प्रतिउत्तर म्हणून अतिरेक्यांनी शनिवारी पुन्हा काबुलवर हल्ला केला. एकूणच काबुल ही सध्या रणभूमी बनली आहे. अमेरिका आणि तालिबान यांच्या लढाईत सर्वसामान्य अफगाण नागरिकांचे मात्र हकनाक जीव जात आहे. हा संघर्ष लवकर संपेल असे वाटत नाही कारण अफगाणिस्तान कहेत घेतल्यापासून तालिबान्यांचा जोर वाढला आहे. शिवाय तालिबानला इसिस आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मदत करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढणार असल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. असे असले तरी जगातील बलाढ्य देश अजूनही तालिबान विरुद्ध ठोस भूमिका घेताना दिसत नाही. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने तालिबानवर ड्रोन हल्ला केला असला तरी अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे तालिबानविरुद्धचे धोरण अद्याप सबुरीचेच आहे. रशिया, चीन आणि इराण यांची भूमिकाही संशयास्पद अशीच आहे. चीन, रशिया यांनी तालिबानला विरोध केला की समर्थन हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन यांनीही आपले पत्ते अद्याप खुले केले नाही. भारतानेही सध्या नरो वा कुंजरो वा अशीच भूमिका घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ, जी सेवन, नाटो यासारख्या आतंरराष्ट्रीय संस्था देखील मूग गिळून बसल्या आहेत. जगातील बलाढ्य देश तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची ही चुप्पी तालिबानच्या पथ्यावर पडत असून तालिबान अधिक शक्तिशाली होत आहे. तालिबान शक्तिशाली होणे जगाला परवडणारे नाही. तालिबान शक्तिशाली होणे म्हणजे दहशतवाद शक्तीशाली होणे. तालिबानला आताच रोखले नाही तर पुढे जाऊन तो मोठा भस्मासुर बनेल. हा भस्मासुर आताच रोखला नाही तर तो जगभर पसरेल. हा भस्मासुर रोखायचा असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने आताच ठोस भूमिका घ्यायला हवी. तालिबान विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र यायला हवे.