अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा  : भारतासाठी डोकेदुखी
 ताल" /> अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा : भारतासाठी डोकेदुखी
IMG-LOGO
Home राजकारण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा : भारतासाठी डोकेदुखी
राजकारण

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा : भारतासाठी डोकेदुखी

August 2021 332 Views 0 Comment
IMG
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा  : भारतासाठी डोकेदुखी
 तालिबान या कट्टर दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा कब्जा मिळवला आहे. मागील पंधरवड्यातच तालिबानने अफगाणिस्तानच्या ७५ टक्के भूभागावर कब्जा केल्याचे घोषित केले होते. १५ ऑगस्ट रोजी तालिबानी लष्कराने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला करून काबुल ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. वीस वर्षानंतर अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानचे राज्य आले आहे. तालिबानने काबुल जिंकल्यानंतर अफगाणिस्तानातील जनता भयग्रस्त झाली आहे. तालिबानने काबुलमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसा आणि लुटालूट केली आहे. तालिबानने काबूलमधील राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतले आहे. तेथील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. तालिबान्यांच्या भीतीने लोक देश सोडून जात आहे. तालिबानपुढे अफगाणिस्तानातच्या सरकारने हात टेकले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष आमिरउल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानातून पलायन केले आहे. अफगाणिस्तानवर कब्जा मिळवताच तालिबानने तिथे शरिया कायदा लागू केला आहे. त्यांनी  अफगाणिस्तानचे नावही बदलले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचे  नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले आहे. राष्ट्राध्यक्षांनिच देश सोडल्याने जनता भयग्रस्त झाली आहे. तालिबान ही कट्टरपंथी संघटना आहे हे आपण जाणतोच. आधुनिक जीवनपद्धतीला त्यांचा विरोध आहे. त्यांनी महिलांवर अनेक जाचक अटी लादले आहेत. त्यांची विचारधारा अठराव्या शतकातील आहे. तिथे राहणे म्हणजे नरकात राहण्यासारखे आहे म्हणूनच अफगाण नागरिक देश सोडण्यासाठी धडपडत आहेत. अफगाणिस्तानात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींवर जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य येणे ही जागतिक पातळीवर मोठी घडामोड आहे. या घटनेचे भविष्यात दूरगामी परिणाम होणार आहे. भारतावर देखील याचा मोठा परिणाम होणार आहे. भारतासाठी अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य येणे धोक्याचे आहे. कारण अफगाणिस्तान हा भारताचा मित्र देश आहे. तालिबानची मागील राजवट वगळता  भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध अतिशय जवळचे होते. किंबहुना दक्षिण आशियात भारताला दोनच जवळचे मित्र आहेत भूतान आणि अफगाणिस्तानात. भूतानचा आकार आणि त्याचे भौगोलिक स्थान विचारात घेतले आणि अफगाणिस्तानातील जागतिक पातळीवर असलेले भू राजकीय महत्व लक्षात घेता अफगाणिस्तान हा भारतासाठी अतिशय महत्वाचा देश आहे. २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून तालिबानचा बिमोड झाला तेंव्हा अस्तित्वात आलेल्या सरकारला भारताने खूप मदत केली. अफगाणिस्तानमध्ये सर्वाधिक गुंतवणूक भारताने केली. तिथल्या संसदेसह अनेक मोठे प्रकल्प भारताने उभारले आहेत. भारताकडून अफगाणिस्तान लष्करी साहित्यही विकत घेत होता.  भारत आणि अफगाणिस्तानात लष्कराने अनेकदा एकत्रित सराव केला आहे. अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मागील वीस वर्षात भारताने २२  हजार कोटी रुपये खर्चले आहेत. त्यांचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी अनेकदा भारत भेटीवर आले आहेत. आता अफगाणिस्तानवर तालिबान्यांची सत्ता आल्याने भारताने गुंतवलेले हजारो कोटी रुपये वाया जाणार आहेत शिवाय भारताचा एक महत्वाचा मित्र देश भारतापासून दुरावणार आहे. तालिबान आणि भारत यांची  मैत्री कदापि होऊ शकत नाही. तालिबानची विचारधारा पूर्णपणे भिन्न आहे. तालिबान हा भारताला शत्रूच मानतो. काबूलवर कब्जा मिळवताच तालिबानच्या लष्कराने भारताला आव्हान दिले आहे. अर्थात त्यांच्या आव्हानाला भारत भीक घालणार नाही पण ते भारताला आव्हान देत आहेत कारण त्यांना चीन आणि पाकिस्तानची फूस आहे. तालिबान्यांना पाकिस्तानची पूर्वापार मदत होती. अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आल्यावर सर्वाधिक आनंद पाकिस्तानला झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानचे स्वागत केले आहे. तालिबानला मान्यता देणारा पाकिस्तान हा जगातील पहिला देश आहे. चीनचाही अफगाणिस्तानमध्ये मोठा रस आहे. तालिबानच्या लष्कराला चीन आणि पाकिस्ताननेच लष्करी साहित्य पुरवले हे जगजाहीर आहे. तालिबाननेही चीन आणि पाकिस्तान आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर या बदलत्या भू- राजकीय घडामोडींचा भारत आणि अफगाणिस्तान संबंधांवर काय परीणाम होईल याचा आणि त्याचा भारताला किती तोटा होईल, हे समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानशी जवळील साधणाऱ्या तालिबानमधल्या नेत्यांचे वर्चस्व भारताच्या सुरक्षेच्या आणि राजकीय धोरणांच्या दृष्टीने चिंता वाढवणारे ठरू शकते. तालिबान ही कट्टर दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, लष्कर ए जब्बार यासारख्या कट्टर दहशतवादी संघटनांशी त्यांचे जवळचे संबंध आहे. त्यांची विचारधारा एक आहे. त्यामुळे अफगाणिस्तान ते पाकिस्तान दरम्यान एक दहशतवादी कॉरिडॉर तयार होऊ शकतो. तालिबान सत्तेत आल्याने पाकिस्तानातील कडव्या गटांनाही बळ मिळणार आहे. तालिबान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना यांची युती भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या युतीला चीनचे पाठबळ मिळणार हे उघड आहे त्यामुळे भारताची चिंता आणखी वाढणार आहे.

Copyright © All Rights are Reserved | Developed by stancecode.com