परिस्थितीच्या विस्तवात तावून सुलाखून निघालेला हिरा-प्रा.डॉ.भ" /> परिस्थितीच्या विस्तवात तावून सुलाखून निघालेला हिरा-प्रा.डॉ.भारत गरंडे सर
IMG-LOGO
Home सामाजिक परिस्थितीच्या विस्तवात तावून सुलाखून निघालेला हिरा-प्रा.डॉ.भारत गरंडे सर
सामाजिक

परिस्थितीच्या विस्तवात तावून सुलाखून निघालेला हिरा-प्रा.डॉ.भारत गरंडे सर

February 2025 119 Views 0 Comment
IMG

परिस्थितीच्या विस्तवात तावून सुलाखून निघालेला हिरा-प्रा.डॉ.भारत गरंडे सर

 

        जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता....

           वरील ओळी स्वप्न पाहणाऱ्यांनाच लागू पडतात परंतु या ठिकाणी परिस्थिती थोडी उलट आहे ज्या अंगठे बहाद्दर आई-वडिलांना स्वप्न म्हणजे काय हेच माहित नाही आणि मग ते पूर्ण करणे किंवा त्याच्या मागे धावणे ही गोष्ट फार तर दूरच आहे. एकेकाळी शिक्षणाचा गंध नसलेल्या घेरडी सारख्या गावात शिक्षणामध्ये निरक्षर परंतु विचारांच्या साक्षरतेत बरेच पुढची मजल मारलेल्या गरंडे दांपत्याच्या पोटी जन्म घेतलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे जणू निरभ्र आकाशातील सदैव चमकणारा ध्रुवताराच.

        आज प्राध्यापक डॉक्टर भारत गरंडे सर यांच्या जीवनाच्या संघर्ष प्रवासाच्या पाऊलखुणांकडे वळून बघितले तर फार विलोभनीय आणि अविस्मरणीय अशा प्रकारचे चित्र तयार झाले आहे परंतु हे चित्र तयार होत असताना त्यामागील कष्ट आणि संघर्ष हा सुद्धा सामान्य विचाराच्या पलीकडचा असामान्य संघर्ष आहे. संघर्ष हा गरीबाच्याच घरी जन्म घेतो आणि त्या संघर्षातून जे काही निर्माण होते ते नेहमीच अप्रतिम आणि अविश्वसनीयच निर्माण होते.पैशाची गरीबी घेऊन जन्म घेतला असला तरी विचाराच्या श्रीमंतीचे दान मात्र या व्यक्तीकडे अमाप होते त्या विचाराच्या श्रीमंतीचे भांडवल पुरेपूर वापरून या व्यक्तिमत्त्वाने आज राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतल्याचे दिसून येते आहे विचारांची श्रीमंती घेऊन समाजात वावरणाऱ्या लोकांचे हात धरून सामान्य परिस्थितीतून वाटचाल सुरू करू पाहणाऱ्या या तरुण युवकाला सर्वात मोठा आधार देण्याचे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीप इंगवले सर आणि इंगवले कुटुंबीय सर्वप्रथम या व्यक्तिमत्त्वाने भारत गरंडे यांच्या प्रगतीच्या रूळावर उभे असलेल्या गाडीला धक्का देण्याचे काम केले त्यांनी दिलेला तो धक्का आजही सरांच्या वाटचालीत नेहमीच सदैव तेवत राहणाऱ्या निरंजनाप्रमाणे उर्जा देतो आहे.......याच उर्जेचा आधार घेऊन परत कधीच पाठीमागे वळून न पाहता या व्यक्तीमत्वाने दिवसेंदिवस यशाचा हिमालय चढण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आणि सुरूच राहील यात कोणतीही शंका नाही. सर्वप्रथम त्यांनी घेरडी येथील संजय कोकरे यांच्या शिवशंभो मेडिकल मध्ये सफाई कामगार म्हणून तीन वर्षे काम केले त्यानंतर श्री. भीमराव बनकर यांच्या सांगोला येथील गजानन मेडिकल मध्ये बी. फार्मसी शिकत असताना नाईट शिफ्ट मध्ये काम केले त्यानंतर मेथवडे येथील फार्मसी कॉलेजमध्ये झेरॉक्स दुकानापासून व्यवसायाचा सुरू केलेला श्री गणेशा मेडिकल क्षेत्राची गरज ओळखून सुरू केलेली फार्मा इंडिया लाइफ सायंसेस प्रा. लि. मुंबई व मेट्रिक्स हेल्थकेअर प्रा. लि. गुजरात कंपनी सोबत सुविद्य पत्नी विद्याताई बंधू दशरथ तसेच मित्रपरिवार यांच्या साह्याने विविध तपासण्या साठी सुसज्ज व अत्यल्प दरात लॅबोरेटरी सुरू केली. सांगोला, घेरडी इत्यादी ठिकाणी मेडिकल स्टोअर्स,किरकोळ व होलसेल औषधे विक्री तसेच कृषी क्षेत्रातील स्वतःच्या शेतीत विविध प्रयोग करताना आंबा पेरू सीताफळ इत्यादी फळ पिकासह दुग्धोत्पादन ही सुरू आहे.परंतु ही वाटचाल सुरू असताना त्यांना आपल्या कॉलेजमध्ये काम करीत असताना त्यांना नेहमीच काहीतरी उणीव जाणवत होती माणूस हा पूर्ण जीवनभर विद्यार्थी असतो याची जाणीव त्यांना वारंवार होत होती आणि त्याच जाणीवेतून त्यांनी पुढील शिक्षणासाठी मार्ग शोधायला सुरुवात केली त्यातूनच त्यांनी औषध निर्माण क्षेत्रात भोपाळ IES युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टरेट(Phd) साठी प्रवेश घेतला आणि अत्यंत मानाची अशी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (PHD) ही पदवी प्राप्त केली. त्याची दखल घेऊन अत्यंत नावाजलेल्या अशा सीबीएस न्यूज मराठी या चॅनलने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा गौरव केला आहे.अलिकडच्या काळात पुरस्कार मिळवणं ही गोष्ट फार मोठी राहिली नाही असे वाटते परंतु पुरस्कार मिळवणं आणि पुरस्कार मिळणं यामध्ये खूप मोठा फरक आहे सरांनी पुरस्कार मिळवला नाही तर तो त्यांना मिळाला आहे हे फार महत्त्वाचे आहे. सरांच्या यशस्वी आलेखामागे यशाचे रहस्य म्हणजे ते कोणत्याही गोष्टीत करत असलेले नियोजनबद्ध काम होय उदाहरण द्यायचे म्हटले तर दादा कोंडकेंच्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेला असा प्रसंग आम्ही त्यांच्या स्वतःच्या विवाहात अनुभवला स्वतःच्या विवाहाच्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन अगदी डोक्यावर अक्षदा पडेपर्यंत स्वतः करून हजारो लोकांच्या उपस्थितीत अत्यंत भव्य दिव्य व डोळ्याचे पारणे फेडणारा असा विवाह सोहळा पार पाडला शेवटी सरांसाठी जाता जाता चार ओळी एवढ्याच म्हणेन की 

 

    *संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध होतो*

       आपण तो रुबाब सिद्ध करून दाखवला आहे आणि पुढेही तोच रुबाब टिकवून ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.धन्यवाद.

 

            शब्दांकन 

श्री अनिलकुमार भारत लवटे सर 

मो.9552332622