वाळू तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुक" /> वाळू तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला..!
IMG-LOGO
Home क्राईम वाळू तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला..!
क्राईम

वाळू तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला..!

January 2023 414 Views 0 Comment
IMG

वाळू तस्करीतही पुष्पा, म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला..!

 

 

पोलिसांची दमदार कारवाई, वर्षभरात पावणे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

 

 

सांगोला (प्रतिनिधी): झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून सध्या त्यांच्यावरही पुष्पाचे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून आपला नाद करायचा नाय, आमच्या वाट्याला जाल तर खबरदार, आपलं एकच काम भरा वाळू, प्रशासनासमोर झुकेगा नही साला अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. शासनाच्या मालमत्तेची लूट होत असून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने पोलिसी खाक्या दाखवत गेल्या वर्षभरात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने पकडून २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाळू माफियांना जोर का झटका दिला आहे. त्यामुळे वाळू तस्करीतील पुष्पाला रोखणार कोण? असा सवाल जनसामान्यांतून उमटू लागला आहे.

           सांगोला तालुक्यातील माण, बेलवण, कोरडा, अप्रूका नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक केली जात आहे. रात्रीला होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाळू चोरटे या धंद्यावर रग्गड कमाईतून गब्बर झाल्याने अनेकांच्या अंगावर ते रात्रीला धावून येत आहेत. तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून भरधाव वेगाने वाहने हैदोस घालत आहेत. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात सुरू असून वाळू चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. 

       वाळू तस्करांचा रात्रीच्या अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविणे, धमकाविणे आदी प्रकार इतरत्र घडतांना दिसतात. वाळूने भरलेल डंपर व ट्रॅक्टर भरदिवसा यंत्रणेच्या नाकावर टिच्चून वावरत आहेत. कोणी तक्रार केली किंवा वरिष्ठांनी आदेश दिले तर नावापुरती कारवाई केली जाते. पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षभरात वाळू तस्करीतील पुष्पावर कारवाई करून तब्बल २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाळूसाठ्याचा लिलाव झालेला नसल्याने वाळू माफियांनी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. अवैध वाळूच्या ओव्हरलोड ट्रॅक्टरमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत.