IMG-LOGO
Home क्राईम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध वाळू उपशावर कारवाई
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध वाळू उपशावर कारवाई

December 2022 66 Views 0 Comment
IMG

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध वाळू उपशावर कारवाई

 

१० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोपटे वस्ती, सांगोला येथील माण नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा टिपर व ट्रॅक्टर ट्रॉली सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख रुपयांचा टिपर, ३ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व २५ हजार रुपयांची पाच ब्रास वाळू असा १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिपर चालक विजय उर्फ बंट्या प्रकाश हजारे रा.वाढेगाव ता. सांगोला व वाहन मालक धनाजी भाऊसो जानकर रा. कोपटेवस्ती ता. सांगोला तसेच अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.अनिल सनगल्ले, पो.हे.कॉ. मोहन मनसावले, पो.ना. गणेश बांगर, पो. कॉ. अक्षय डोंगरे असे सांगोला हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना कोपटेवस्ती शिवारात माण नदीच्या पात्रातून काही इसम अवैधरित्या वाळूची चोरटी विक्री करण्याकरीता वाळू उपसा करून वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस नाईक थिटे असे बातमीच्या ठिकाणी जात असताना एम. एच.१२ पी.क्यू.२८०४ हा टिपर येत असताना दिसून आला. पोलिसांनी वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला. 

          परंतु चालकाने टिपर मधील वाळू कोपटेवस्ती येथील संकेत उर्फ पप्पु देशमुख याच्या घराजवळ रिकामी केली. दरम्यान पोलिसांनी टीपर चालक विजय उर्फ बंट्या प्रकाश हजारे रा.वाढेगाव ता. सांगोला यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने वाळूची कोणतीही रॉयल्टी, पावती अथवा पास परवाना नसल्याचे सांगून सदरची वाळू कोपटेवस्ती येथील माण नदीच्या पात्रातून चोरून भरली असल्याचे सांगीतले. तसेच वाहन मालकाचे नाव धनाजी भाऊसो जानकर रा. कोपटेवस्ती ता. सांगोला असे असून त्यांच्या सांगण्यावरुन वाळू भरली असल्याचे सांगीतले. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख रुपयांचा टिपर व २० हजार रुपयांची चार ब्रास वाळू असा ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे यांनी टिपर चालक विजय उर्फ बंट्या प्रकाश हजारे रा.वाढेगाव ता. सांगोला व वाहन मालक धनाजी भाऊसो जानकर रा. कोपटेवस्ती ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      तसेच दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे 

पो.ना.धनराज गायकवाड, पो.ना.अनिस शेख, सांगोला पोलीस ठाणेकडील पो.ना. भोसले, पो. कॉ. सावंत पेट्रोलिंग करीत असताना कोपटेवस्ती जवळील माणनदीच्या पात्रातून एक ट्रॅक्टर टॉलीसह येत असताना दिसला. संशय आल्याने चालकास थांबविले असता ट्रॅक्टर चालक हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या इंजिन नंबरवरून वाहन पोर्टलवर पाहणी केली असता सदरचे वाहन सागर जानकर रा.धनगर गल्ली सांगोला याचे असल्याचे समजले. या कारवाईत पोलिसांनी 3, लाख ५ हजार रुपयांचा ट्रॅक्टर व 5 हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक धनराज गायकवाड यांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.