पोलिसांच्या कारवाईत हातीदमधील हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त पोलिसांच्या कारवाईत हातीदमधील हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त
IMG-LOGO
Home क्राईम पोलिसांच्या कारवाईत हातीदमधील हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त
क्राईम

पोलिसांच्या कारवाईत हातीदमधील हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त

July 2022 64 Views 0 Comment
IMG

पोलिसांच्या कारवाईत हातीदमधील हातभट्टीचे दोन अड्डे उध्वस्त

1 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी हातीद ता.सांगोला येथील अवैधरीत्या सुरू असलेले हातभट्टी दारू तयार करण्याचे दोन अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार लिटर गूळमिश्रित रसायन, नवसागर, गूळ, तयार हातभट्टीची दारू असा 1 लाख 38 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव चव्हाण व आकाराम नामदेव चव्हाण दोघे रा. हतीद ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, सपोनि माने, पोसई नाळे, पोहेकॉ वाघ, पोना देवकते, पोना पाटील, पोना बाबासाहेब पाटील असे मिळून पेट्रोलींग करीत असताना हातीद येथील चव्हाण मळा येथे लक्ष्मण नामदेव चव्हाण हा घरासमोरील झाडीत चोरुन हातभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता लक्ष्मण चव्हाण हा सदर भट्टीला जाळ घालून हातभट्टी काढत असताना मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजार रुपयांचे १ हजार ४०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत रसायन, ५ हजार ४०० रुपये किमतीची ९० लिटर हा. भ. दारु, ३ हजार रुपयांचा 100 किलो गुळ, १०० रुपयांच्या नवसागर कांड्या असा 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रसायनाने भरलेले लोखंडी बॅरल वाहतुकीस अवजड असल्याने ते जागीच मोडतोड करून सदरची अवैध हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. 

       त्या ठिकाणापासून पुढे एक किमी अंतरावर आकाराम नामदेव चव्हाण हा हातीद गावातील ओढा चव्हाण वस्ती येथे चोरुन हाटभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता आकाराम चव्हाण हा सदर भट्टीला जाळ घालून हातभट्टी काढत असताना दिसून आला. मात्र पोलिसांना पाहताच तो चिलारीच्या झाडातून ओढ्याच्या दिशेने पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी ६४ हजार रुपये किमतीचे 1600 लिटर गूळमिश्रित रसायन, ६ हजार ६०० रुपयांची 110 लिटर हातभट्टी दारु, ३ हजार ७५० रुपयांचा १२५ किलो गुळ, नवसागर कांड्या असा 74, हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर रसायनाने भरलेले लोखंडी बॅरल वाहतुकीस अवजड असल्याने ते जागीच मोडतोड करून सदरची अवैध हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ३ हजार लिटर गूळमिश्रित रसायन, नवसागर, गूळ, तयार हातभट्टीची दारू असा 1 लाख 38 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन्ही हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले आहेत. याबाबत पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी लक्ष्मण नामदेव चव्हाण व आकाराम नामदेव चव्हाण दोघे रा. हतीद ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.