अमेझॉन ची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक गुन्" />
सांगोला (तालुका प्रतिनिधी): अमेझॉन कंपनीची सांगोला व सोलापूर जिल्ह्याची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून एकाची १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तानाजी रंगनाथ पवार रा. वाढेगाव रोड, साळुंखे वस्ती सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय उर्फ बाळसो उर्फ बाबासो नारायण थोरात, प्रणित महारुद्र टिळक, कान्ता दत्ता थोरात यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तानाजी रंगनाथ पवार रा. वाढेगाव रोड, साळुंखे वस्ती सांगोला ता. सांगोला यांची नोव्हेंबर सन 2019 मध्ये मित्र सुनिल आदलिंगे रा. कमलापूर ता. सांगोला यांच्या ओळखीतून दत्तात्रय उर्फ बाळसो उर्फ बाबासो नारायण थोरात रा. बि.टी. कवडे रोड, स्वामी समर्थ नगर, हडपसर पुणे यांच्यासोबत ओळख झाली. या ओळखीतून तानाजी पवार यांना दत्तात्रय थोरात यांनी तुम्हाला अमेझॉन कंपनीची सांगोला व सोलापूर जिल्हा एजन्सी देतो, तुम्ही पैसे गुंतवणुक करणार का ? असे विचारले. यावर तानाजी पवार यांनी सांगोला तालुक्याची एजन्सी घेण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले असता त्यांनी तुम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर पैसे भरल्यानंतर तुमचे अग्रिमेंट करून एजन्सी कडुन टेनिंग दिले जाईल असे सांगीतले.
त्यानंतर विश्वासात घेवून सांगीतल्याने तानाजी पवार पैसे भरण्यास तयार झाल्याने दत्तात्रय थोरात यांनी त्यांना माझे पार्टनर व सल्लागार प्रणित महारुद्र टिळक यांचे फोन पे मोबाईल नंबर पैसे पाठवण्यास सांगितले. तानाजी पवार यांनी त्या फोन पे वर ४० हजार रुपये भरले. त्यावेळी दत्तात्रय थोरात यांनी सोलापुर जिल्ह्याची अमेझॉन एजन्सी तुम्हाला घेवून देतो असे सांगीतले. यावर पवार यांनी तुम्ही सोलापुरची अमेझॉनची एजन्सी मला द्या असे सांगितले असता दत्तात्रय थोरात यांनी आणखी एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर तानाजी पवार यांनी सांगोला एजन्सीसाठी 60 हजार रुपये रुपये व सोलापुर एजन्सीसाठी 15 हजार रुपये असे 75 हजार रुपये दत्तात्रय थोरात यांनी सांगीतलेल्या कान्ता दत्ता थोरात यांचे फोन पे वर पाठवले. तसेच 15 हजार रुपये प्रणीत टिळक यांचे फोन नंबरवर पाठवले. त्यानंतर एजन्सीसाठी एक लाख रुपये पाठवले आहेत, तरी एजन्सीचे करार करून घ्या असे पवार यांनी सांगीतले असता थोरात यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड फोटो, कॅन्सल चेक पाठवण्यास सांगीतले. त्यावेळी पवार यांनी सर्व कागदपत्रे पाठवली.
त्यानंतर तानाजी पवार यांनी दत्तात्रय थोरात यांना फोन करून एजन्सीबाबत विचारणा केली असता थोरात यांनी प्रकृतीचे कारण सांगत लवकरच एजन्सीची कागदपत्रे पाठवून देतो असे सांगीतले. दरम्यान तानाजी पवार यांनी 1 लाख 90 हजार रुपये पाठवून देखील दत्तात्रय थोरात यांनी सांगोला एजन्सीचे कोणतेही अग्रिमेंट केले नाही. त्यानंतर तानाजी पवार यांनी थोरात यांना तुम्ही माझे पैसे तर परत द्या, अथवा सांगोला येथील एजन्सी तर द्या असे म्हणाले असता त्यांनी वारंवार फोनवरुन खोटे आश्वासन देवून आजतागायत टाळाटाळ केली. वारवार फोन केला असता दत्तात्रय थोरात हे फोन उचलत नसल्याने दत्तात्रय थोरात यांनी त्याचे पार्टनर व सल्लागार प्रणित महारुद्र टिळक व कान्ता दत्ता थोरात यांनी संगनमताने १ लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तानाजी पवार यांची खात्री झाली. याबाबत तानाजी रंगनाथ पवार रा. वाढेगाव रोड, सांळुखे वस्ती सांगोला यांनी दत्तात्रय उर्फ बाळसो उर्फ बाबासो नारायण थोरात, प्रणित महारुद्र टिळक, कान्ता दत्ता थोरात यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.