कामचुकार डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही - कामचुकार डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही - आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे
IMG-LOGO
Home आरोग्य कामचुकार डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही - आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे
आरोग्य

कामचुकार डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही - आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे

November 2022 159 Views 0 Comment
IMG

कामचुकार डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही -आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): जुनोनी अपघातांच्या प्रकरणात सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी अचानक ग्रामीण रुग्णालयाला भेट देत झाडाझडती घेतली. डॉक्टरांनी सामाजिक व नैतिक जबाबदारीचे भान ठेवून रुग्णांना सेवा द्यावी. कामचुकार डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिला. त्यामुळे आतातरी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा द्यावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

      जुनोनीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातात जखमींना सांगोला ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचार मिळाले नसल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. तसेच यावेळी वैद्यकीय अधीक्षकांसह इतर डॉक्टरांनी रुग्णालयात येण्यास टाळाटाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रुग्णालयाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत दैनिक दामाजी एक्सप्रेसमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा संवेदनशून्य कारभार या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. 

       जुनोनी अपघातांच्या प्रकरणात सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी अचानक ग्रामीण रुग्णालयाला भेट देत झाडाझडती घेतली. अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी हजर नसलेल्या डॉक्टरांची कानउघाडणी केली. गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, स्थानिक डॉक्टरांनी चांगली सेवा देण्याची नैतिक जबाबदारी आहे. ओपिडीच्या वेळेत डॉक्टरांनी रुग्णालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे तर एक डॉक्टर 24 तास रुग्णालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. गावात सेवा करण्याची संधी मिळाल्याने डॉक्टरांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा करावी. डॉक्टरांची कानउघाडणी करून कामकाजात सुधारणा करावी असा सल्ला दिला. डॉक्टरांनी मानसिकतेत बदल करून कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिला. 

 

सांगोला ग्रामीण रुग्णालयात वार्डमध्ये स्वच्छ्ता व्यवस्थित नसल्याने आरोग्य उपसंचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी नाराजी व्यक्त केली. १०८ रुग्णवाहिका व डॉक्टर यांच्यात समन्वय असला पाहिजे. रुग्णालयात ब्लड स्टोरेज युनिट सुरू करणार असल्याचे सांगत डॉ. उत्तम फुले यांच्याकडील वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार काढून घेतला असून तो डॉ.अरविंद गिराम यांच्याकडे सोपवला असल्याचे डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

 

पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. दरम्यान कधी नव्हे तो ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, स्टाफ गणवेशात ओळखपत्रासह हजर होता. जुनोनी अपघात प्रकरणानंतर रुग्णालयाची झाडाझडती होणार असल्याची शक्यता गृहीत धरून दोन दिवसांपासून साफसफाई केली जात होती.