नागरी वस्तीत असणाऱ्या फॅब्रिकेशन वर्कशॉप मुळे नागरिक हैरान
रहिवाशांना श्वसनाचे विकार, मानसिक त्रास व कर्णबाधा आजार होऊ लागले
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला शहरातील मेडशिंगी रोडवर नागरी वस्तीत असणाऱ्या फॅब्रिकेशन वर्कशॉप हटविण्याचा संदर्भात तेथील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या फॅब्रिकेशन वर्कशॉप मुळे होणाऱ्या कर्कश आवाज व स्प्रे पेंटिंग मुळे येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील हॉस्पिटलमधील रुग्ण व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तेथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर फॅब्रिकेशन वर्कशॉप दुसरीकडे हटविण्याची मागणी केली आहे.
सांगोला शहरातील जुना मेडशिंगी रोड परिसरातील सर्वे नंबर 2 मध्ये नागरी वस्ती विकसित होत आहे. अनेक नागरिकांनी नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेऊन या परिसरात घरकुले बांधली आहेत. याच परिसरात सचिन रामचंद्र झपके व त्यांचा भागीदार या दोघांचे फॅब्रिकेशन वर्कशॉप आहे. या वर्कशॉप मधील कामगार दिवसभर स्टील कटिंगचे व स्प्रे पेंटिंगचे काम करत असतात. स्टील कटिंग च्या होणाऱ्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषण व प्रिंटिंग मुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर त्रासामुळे परिसरातील नागरिकांना व बालकांना श्वसनाचे विकार, मानसिक त्रास व कर्ण बाधा होऊ लागली आहे. एकूणच या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय वर्कशॉप साठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वीज पुरवठ्यामुळे घरगुती मिळणारा वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे.
त्याचबरोबर याच परिसरात सांगोला मल्टीस्पेशालिटी आय. सी.यु. हॉस्पिटल असून तेथील रुग्णांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर उत्कर्ष प्राथमिक विद्यालय व गिताबाई बनकर अध्यापक विद्यालय याच परिसरात आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून नागरिकांच्या निरामय व शांततापूर्ण आरोग्यासाठी या परिसरातील सदरचे वर्कशॉप हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा. राजेंद्र ठोंबरे, विलासराव पाटील, हरिबा घोडके, सुभाष दिघे, गजानन वाईकर, व्ही. बी. रोंगे, देवदत्त केदार आदीं रहिवाशांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे