अफगाणिस्तान न्यूज पोर्टल
20 वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9/11 च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात सैन्य पाठवणारे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर म्हणतात की, अमेरिकेच्या सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयामुळे जगातील प्रत्येक जिहादी गट खूश आहे. शनिवारी आपल्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एका प्रदीर्घ लेखात ब्लेअर म्हणाले की, अचानक सैन्याने माघार घेतल्याने तालिबानला सत्ता हस्तगत करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मुलींच्या शिक्षण आणि राहणीमान सुधारण्यासह ते सर्वकाही गेलंय जे अफगानिस्तानने मागील 20 वर्षात मिळवलं होतं.1997-2007 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केलेले ब्लेअर म्हणाले, "अफगाणिस्तान आणि तेथील लोकांना एकटं सोडणे दुःखद, धोकादायक होते, असं करणे ना त्यांच्या हिताचे आहे, ना आमच्या हिताचे." जग आता पाश्चिमात्य भूमिकेबद्दल अनिश्चित आहे. कारण अफगाणिस्तानातून अशा प्रकारे माघार घेण्याचा निर्णय धोरणाने नव्हे तर राजकीय हेतूने होता हे स्पष्ट आहे.माजी पंतप्रधान ब्लेअर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर 'युद्ध कायमचे संपवण्यासाठी मूर्ख राजकीय घोषणा वापरल्याचा' आरोप केला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून अशा लोकांना जोपर्यंत बाहेर काढले जात नाही, ज्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. तोपर्यंत ब्रिटनचे तिथं राहणं नैतिक दायित्व आहे. सैन्य माघार घेणे हे पाश्चात्य देश किंवा अफगाणिस्तानच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले.सध्या अफगाणिस्तानमध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे. अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा झाल्यानंतर अमेरिकेवर जगभरातून टीका होत आहे.